काकडवाडीत पाणीटंचाईवर तातडीचा दिलासा: आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने दररोज टँकर
संगमनेर/ प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील काकडवाडी गावात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून दररोज पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या पाण्याच्या समस्येवर तात्पुरता का होईना, पण प्रभावी तोडगा निघाला आहे.
उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने काकडवाडी गावात पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसू लागली होती. विहिरी आणि बोअरवेलचे पाणी कमी झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन गावातील पत्रकार दत्तात्रय घोलप, योगेश मुळे, अर्जुन शिरसाठ, गोकुळ गायकवाड, शरद महाराज ढवळे, भाऊसाहेब काळे, सतीश मुळे, गणेश काळे यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमदार खताळ यांच्याकडे तातडीने पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी केली होती.

युवा कार्यकर्त्यांची मागणी गांभीर्याने घेत आमदार खताळ यांनी जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तत्काळ निर्णय घेत काकडवाडी गावासाठी दररोज पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू केला. जोपर्यंत पावसाचे आगमन होत नाही, तोपर्यंत हा टँकर नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती शिवसेना महायुतीचे युवा कार्यकर्ते योगेश मुळे यांनी दिली. टँकर सुरू झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी सोय झाली असून महिलांची व नागरिकांची पाण्यासाठी होणारी दैनंदिन धावपळ कमी झाली आहे.
आमदार अमोल खताळ यांनी वेळेत घेतलेल्या या निर्णयाबद्दल काकडवाडी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले असून, या मदतीमुळे गावाला दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.
“एका फोनवर प्रश्न मार्गी!”संगमनेर तालुक्यासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक दररोज आपल्या विविध समस्या घेऊन आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात येत असतात. पाणीटंचाई, रस्ते, दवाखाने अशा मूलभूत प्रश्नांपासून ते इतर स्थानिक अडचणींपर्यंत अनेक विषय नागरिक मांडतात.या समस्यांची दखल घेत आमदार खताळ तात्काळ निर्णय घेत एका फोनवर प्रश्न मार्गी लावत असल्याचा अनुभव नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे “एका फोनवर प्रश्न सोडवणारे आमदार” अशी त्यांची ओळख गावोगाव निर्माण झाली आहे.







