अहिल्यानगर वृत्तसंस्था: जिल्हा आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरविरुद्ध सुरू केलेल्या शोध मोहिमेत गेल्या महिन्यात ७ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. यासंदर्भात आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे फिर्यादी दाखल केल्या आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी ही माहिती दिली. श्रीगोंद्यात दोन, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर, संगमनेर व राहुरी येथे प्रत्येकी एक बोगस डॉक्टर आढळले आहेत. आपण मागील महिन्यात पाथर्डी येथील एका डॉक्टर बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना माहिती दिली होती. बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट कशा पद्धतीने जिल्ह्यात सुटला आहे. यांचे वृत्त प्रसिद्ध केले होते. यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी माहिती घेत वरील कारवाई केली आहे.

राहुरी येथील बोगस डॉक्टरने आरोग्य यंत्रणेने त्याच्या निसर्गोपचार केंद्राविरुद्ध कारवाई करू नये, तपासणी करू नये यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाची स्थगिती उठताच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तो तब्बल ४३ खाटांचे निसर्गोपचार केंद्र चालवत होता. शेवगावमध्ये तर मोठा अजब प्रकार उघडकीस आला. डॉक्टर मुलाच्या नावाखाली वडीलच अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे व रुग्णांवर औषधोपचार करत असल्याचे आढळले. रुग्णांच्या जीविताशी खेळणारा हा प्रकार थांबवा अशी विनंती आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी यांना भेटून केली होती.
ग्रामीण भागात बोगस डॉक्टर फलक न लावता व वारंवार जागा बदलत व्यवसाय करताना आढळत आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडचणी निर्माण होतात. ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत बोगस डॉक्टर व्यवसाय सुरू करतात, त्यांची ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांनी व स्थानिक नागरिकांनी खातरजमा करणे आवश्यक असल्याचे मत आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त केले जाते.बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी तालुका पातळीवर गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांची समिती तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांची समिती कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बोगस डॉक्टर शोधण्यासाठी मोहीम सुरू करण्याची सूचना आरोग्य विभागाला केली होती.

ग्रामपंचायतींनी लक्ष ठेवावेनागरिकांनी उपचार घेताना संबंधित वैद्यकीय व्यवसायिकाची पात्रता, पदवी, तो नोंदणीकृत आहे का याची खात्री करावी. त्याच्या वैद्यकीय व्यवसायाच्या पदवी, शिक्षणाविषयी शंका असल्यास आरोग्य विभाग किंवा पोलिसांकडे तक्रारी कराव्यात. ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांनी रुग्णसेवा देणाऱ्यांवर लक्ष ठेवून बोगस वैद्यकीय व्यावसायिक आढळल्यास तक्रारी कराव्यात: डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर.
राजसत्ता न्यूज च्या बातमीचे पडसाद
मागील महिन्यात आपण केलेल्या बातमीच्या अनुषंगाने ही कारवाई झाल्याचे कळते. रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा कुणालाही अधिकार नाही उलट असे बोगस मुन्नाभाई वर कडक कारवाई करून शासन करावे अशी अशायाची बातमी केली होती. यात अनेक राजकीय लोक बोगस डॉक्टरांना पाठीशी घालत असल्याचे देखील समोर येत आहे.






