झरेकाठी प्रतिनिधी: (सोमनाथ डोळे)१८ ऑगस्ट २०२६, मेरा रेशम मेरा अभिमान (MRMA 2.0) अभियानांतर्गत शेतकऱ्यांमध्ये रेशीम उद्योगाच्या संधी तसेच शास्त्रीय पद्धतींची जनजागृती करण्याच्या उद्देशाने ग्रामीण विविध कार्यकारी सहकारी संस्था, ब्राम्हणी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर येथे रेशीम उद्योग जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ, राज्य रेशीम विभागाचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, प्रगत रेशीम उत्पादक शेतकरी तसेच अद्याप रेशीम उद्योग न करणारे शेतकरी अशा एकूण ३५ सहभागींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन . संदीप एम. आगवणे, जिल्हा रेशीम अधिकारी, अहिल्यानगर; डॉ. करण एस., शास्त्रज्ञ-ब, CSB-CSRTI, म्हैसूर; ॲड विवेक भास्करराव लगड , ओम गुरुदेव एंटरप्रायजेस , रेशीम निविष्ठा वितरक, लोणी प्रवरा अहिल्यानगर; प्रा. हर्षल आगळे, मुक्ताई प्रतिष्ठान ; तसेच . विश्वजित तांबे, अनुलोम फाउंडेशन यांच्या सहभागातून करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना रेशीम उद्योगावर कीटकनाशकांच्या अवशेषांचा होणारा परिणाम, माती व पाणी परीक्षणाचे महत्त्व, तुतीवरील किडींच्या एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे (IPM) महत्त्व तसेच आधुनिक व सुधारित रेशीम तंत्रज्ञानाचा शेतपातळीवर अवलंब करण्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच राज्य रेशीम विभागामार्फत नवीन रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या अनुदान व विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
प्रगत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी आपले प्रत्यक्ष अनुभव नवीन व रेशीम उद्योग न करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत शेअर केले. रेशीम उद्योग हा शेतीला पूरक उत्पन्नाचा चांगला स्रोत ठरू शकतो, याबाबत त्यांनी मार्गदर्शन करून अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग स्वीकारण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात माझे रेशीम माझा अभिमान 2.0 , माती परीक्षणाची प्रक्रिया, तुतीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन तसेच राज्य रेशीम विभागाच्या विविध अनुदान व योजनांची माहिती असलेली पत्रके शेतकरी व उपस्थित भागधारकांना वितरित करण्यात आली.

या कार्यक्रमास शेतकरी समुदायाचा उत्स्फूर्त सहभाग व सकारात्मक प्रतिसाद मिळाला. रेशीम उद्योग न करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग सुरू करण्याबाबत उत्सुकता व्यक्त केली. त्यामुळे माझे रेशीम माझा अभिमान 2.0 अभियानांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात रेशीम उद्योगाच्या विस्तारासाठी मोठी संधी उपलब्ध असल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.






