संगमनेर प्रतिनिधी: ई एस आय सी’ योजनेच्या माध्यमा तून बांधकाम कामगारांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, याच उद्देशाने कुटे हॉस्पिटलमध्ये राज्य कर्मचारी विमा योजनेच्या (ई एस आय सी) सेवा केंद्र सुरू केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून डॉक्टरांनी आरोग्य सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. असे मानून रुग्णांवर उपचार करावेत असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी दिला.
संगमनेर शहरातील कुटे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या राज्य कर्मचारी विमा योजनेच्या (ई एस आय सी) सेवा केंद्राचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रदीप कुटे, डॉ. सोनाली कुटे, दादासाहेब कुटे, संदीप कुटे, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, रवींद्र दातीर, केशव जाधव, संभाजी गुंजाळ, डॉ. अतुल गुंजाळ, संगीता पुंड, गुलाब भोसले, प्रवीण दिड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार अमोल खताळ म्हणाले की, “रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा” या भावनेतून प्रत्येक रुग्णाला सेवा भावाने आणि गुणवत्तापूर्ण उपचार देणे ही काळाची गरज आहे. उपचारा साठी आलेल्या व्यक्तीकडे केवळ रुग्ण म्हणून नव्हे, तर माणुसकीच्या दृष्टीने पाहिले गेले पाहिजे. रुग्णालया मध्ये येणाऱ्या सर्व सामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दर्जेदार आरोग्यसुविधा मिळाव्यात, यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. कुटे हॉस्पिटलवर सर्वसामान्य रुग्णांचा मोठा विश्वास आहे. कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास अनेक रुग्णांना सर्वप्रथम या रुग्णालयात दाखल केले जाते आणि त्यांना तत्पर व दर्जेदार उपचार मिळतात. हा विश्वास कायम राखत कुटे हॉस्पिटलने रुग्णसेवेचा प्रवास अधिक व्यापक करावा. तसेच कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ पारदर्शकपणे मिळावा आणि अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. असे ही आमदार खताळ यांनी सांगितले.

प्रास्ताविकात हॉस्पिटल चे संचालक डॉ. प्रदीप कुटे यांनी सांगितले की, राज्य कर्मचारी विमा योजनेअंतर्गत नोंदणीकृत सर्व रुग्णांना गुणवत्तापूर्ण आणि तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी कुटे हॉस्पिटल कटिबद्ध राहील. असे प्रदीप कुटे यांनी आपल्या प्रस्ताविकातून सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सातपुते यांनी केले, तर आभार दादासाहेब कुटे यांनी मानले.






