संपादकीय: विशेष लेख/ सहदेव जाधव
अंगात दैवी शक्ती आहे असे सांगून भोळ्या भाबड्या किंवा दुर्धर आजाराने पिडीत असलेल्या रुग्णांना एक तेल पिशवी, एक अगरबत्ती, एक कापूर डब्बी व नारळ देऊन 100% बरा करण्याचा दावा करणारा एक भोंदूबाबा समोर आला आहे. एका महिलेने आमच्याकडे केलेल्या तक्रारी नंतर आम्ही या भोंदूबाबा चा पर्दाफाश करण्याचे ठरवले. त्यानुसार या भोंदूचे वास्तव समोर आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात आखातवाडे व भातकुडगाव शिवावर एका भोंदूनें आपले मोठे प्रस्थ निर्माण केले आहे. मुंबई पुणे तसेच मोठ्या शहरातील धनदांडग्या लोकांचा वावर या ठिकाणी होत आहेत. सदर भोंदू हा या लोकांना करणी, भूतपिसाच, खाऊ घातलेले पाडून देतो तसेच घरात भुताचा वास आहे ते माझ्या मंत्रोउच्चाराने काढून देतो, धंदा वाढवून देतो, चोरी झालेला ऐवज कोणी चोरला ते सांगतो असे अनेक प्रयोग हा भोंदू बाबा अघोरीं कृत्य करून करत आहे.

भाळवणी ता पारनेर येथे राहणाऱ्या एका महिलेला चक्क तुझ्या घरात एका फासी घेतलेल्या महिलेचे भूत असून त्या भुताला घराच्या बाहेर काढावे लागेल त्यासाठी एक लाख रुपये खर्च येईल. व हे भूत बाहेर काढले नाहीतर ते तुला फाशी घ्यायला भाग पाडेल असा अजब सल्ला या महिलेला दिला. त्यामुळे भयभीत झालेल्या महिलेने शेजारी राहणाऱ्यांना व मूळ घरमालकाकडे चौकशी केली असता या घरामध्ये अश्या कुठल्याही महिलेने फाशी घेतलेली नाही असे सांगितले. यावर संबंधित महिलेला आपली फसवणूक झाल्याचे समजले. आपल्या शरीरात सदर महिलेचे भूत वास करत असून थोड्याच दिवसात हे भूत तुम्हाला फाशी घेण्यास भाग पाडेल असा अजब दावा या भोंदूनें केल्याचे सदर महिलेने सांगितले आहे.
यावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या भोंदूची पोलखोल करण्याचे ठरवले त्यानुसार त्या महिलेला घेऊन पुन्हा त्या भोंदूकडे गेले असता सदर प्रकार उघडकीस आला. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव व आखातवाडे गावच्या शिवेवर उद्धव महाराज नावाचा भोंदू आपले काळे कारनामे करत असल्याची माहिती समोर आली. त्या ठिकाणावर गेलो असता या भोंदू महाराजांची कुंडली समोर आली आहे. मला दैवी शक्ती प्राप्त असून तिचा संचार गुरुवार व रविवार असा असतो. याठिकाणी आम्ही खुलासा करण्यासाठी गेलो असता भूतबाधा, करणी, चोरी गेलेला ऐवजाची माहिती घेण्यासाठी शेकडो लोक त्या ठिकाणी एक लिटर तेलाची पिशवी घेऊन उपस्थित होते. तेल पिशवी नसेल तर प्रवेश नाही त्यामुळे आम्ही एक तेल पिशवी घेऊन त्या ठिकाणी गेलो. जवळपास दोन तासांनी आमचा नंबर लागला.
यावेळी तेथील पिडीत लोकांकडे चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. सदर भोंदू हा एका वृद्ध महिलेला चोरी गेलेला ऐवज तुमच्याच जवळच्या व्यक्तीने चोरला असून तुम्हाला लिंबू देतो हे लिंबू तुम्हाला चोर सापडून देईल असे सांगितले तर उदी देऊन घरातील सर्वाना पाण्यातून पाजून द्या. ज्याच्याकडे चोरी चा ऐवज असेल त्याला जुलाब उलट्या सुरु होतील असा अजब अघोरीं सल्ला देत चोर पकडून देण्याचा दावा केला आहे.

तूझ्या अंगात महिला भुताचा वास एका पिडीत महिलेला चक्क तुझ्या घरात एका महिलेने फाशी घेतली असून ती तुला सुद्धा फाशी घेण्यास भाग पाडत आहे. तू या भुताला बाहेर काढले नाही तर तू काही दिवसात फाशी घेशील त्यामुळे तुला हे भूत तुझ्या घराच्या बाहेर काढावे लागेल. यासाठी त्याठिकाणी मला तुझ्या घरी यावे लागेल. त्यासाठी मोठा खर्च करावा लागेल. भोंदूच्या या मागणीने या पिडीत महिला घाबरून गेली. मांसहार व भात खाल्यास व घरात बनवल्यास ते भूत तुला खूप त्रास देईल. व नंतर तुला कुणीही वाचवू शकणार नाही. या भीतीने पीडितेने थेट आपली रूम बदलण्याच्या हालचाली सुरु केल्या असता सदर रूम मालकाने चौकशी केली असता सदर मालकाने या महिलेला धीर देत असा कुठलाही प्रकार या जागेत झाला नाही याची खात्री दिली. तर शेजारी राहणाऱ्या लोकांनी देखील येथे जवळपास अशी कुठलीही घटना झाली नसल्याचे सांगितले. यानंतर या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे समजले. अन्यथा या महिलेला या भोंदूनें लाखोंचा गंडा घातला असता हे निश्चित.
सर्व जनतेला आम्ही सूचित करतो की, या सर्व घटना या काल्पनिक असतात. आपण मानसिक तणावात राहिल्यास काही काल्पनिक घटना डोळ्यासमोर उभ्या राहतात. भूत असणे, करणी करणे या सर्व घटना या काल्पनिक आहेत आपण यावर विश्वास ठेऊ नये. अंधश्रद्धा बाळगू नये. अन्यथा असे भोंदू मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतात. व यांच्याकडून अघोरीं कृत्याखाली अनेक महिला पुरुष बळी पडल्याचे उदाहरणे घडत असल्याचे आपण बघितलेले आहे. तेव्हा आशा भोंदू पासून सावध रहा सतर्क रहा.






