विखे परिवारावर गरळ ओकायची बंद करा अन्यथा सडेतोड उत्तर देऊ..! भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी राजेंद्र पिपाडा यांना दिला इशारा..!
संगमनेर प्रतिनिधी: राहाता तालुक्यात सध्या राजेंद्र पिपाडा यांनी डॉ सुजय विखे पाटील यांच्यावर टिका करत विखे परिवाराला लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. एकीकडे राजेंद्र पिपाडा यांनी डॉ सुजय विखे पाटलांवर सोशल मीडियाद्वारे टिकेचा भडीमार सुरु केला आहे. या व्हायरल व्हिडीओ मुळे विखे समर्थक नाराजी व्यक्त करत आहेत. राजेंद्र पिपाडा यांनी डॉ सुजय विखे पाटलांवर अगदी खालच्या स्तरावर टीका केल्याने विखे समर्थक व भाजप पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी देखील राजेंद्र पिपाडा यांना थेट इशारा दिला आहे. सचिन शिंदे यांनी म्हंटले आहे की, पिपाडा यांनी आपली स्वतः ची लायकी ओळखून विखे परिवारावर बोलावे. विखे परिवार हा सर्वसामान्य जनतेसाठी दिवस रात्र, सुख दुःखात सहभागी असतात. विखे पाटलांवर प्रेम करणारी जनता त्यांच्यावर होणारी ही टीका कधीही सहन करणार नाही. आपण करत असलेले वक्तव्य हे विखे पाटलांवर असलेला रोष आहे. आपली वृत्ती ही संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. तेव्हा आपण आपला चाललेला आकांडतांडव थांबवावे. अन्यथा सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आम्ही भाजप पदाधिकारी विखे परिवाराला दैवत मानतो, आणि आमच्या दैवताच्या संस्कारांमुळे आम्ही शांत आहोत. तेव्हा येथून पुढे आपण आपली जीभ जी घसरली आहे तिला थांबवावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल. आशा पद्धतीने भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे म्हंटले आहे.

राजेंद्र पिपाडा यांनी काही दिवसांपासून डॉ सुजय विखे पाटील यांना सोशल मीडिया च्या माध्यमातून लक्ष्य केले आहे. या टिकेमुळे राहाता तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात भाजप महायुती सह विखे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे राहाता व शिर्डी येथील राजकीय वातावरण कलुशीत झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राहाता व शिर्डी येथील राजकीय वातावरण तापले आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार तथा भाजप चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यालयाकडून यावर कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र भाजपचे सचिन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘कुत्ते भुकते है, हत्ती चलता है’.असा उपरोधीक टोला पिपाडा यांना लगावला आहे.






