देशभक्तीपर योग-नृत्याने भारावले वातावरण
संगमनेर: दि. १९ ऑगस्ट २०२६ :रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉ. भानुदास जी. डेरे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, संगमनेर येथे ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संगम सेवाभावी संस्थेच्या संचालिका सौ. अंकिता श्रीराज डेरे यांच्या उपस्थितीत तसेच स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेचे अध्यक्ष व माजी सैनिक श्री. प्रकाश कोटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच यावेळी लेफ्टनंट अनिल पावसे, माजी सैनिक रामनाथ ढोले, सुभेदार गोविंद खर्डे, माजी सैनिक लक्ष्मण ढोले, माजी सैनिक रघुनाथ पवार, माजी सैनिक संभाजी पाचारणे आदी माजी सैनिक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर डेरे स्कूलच्या वतीने उपस्थित माजी सैनिकांचा गुलाबाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा उपक्रम ठरला. यानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सैनिकांचे जीवन, देशसेवेतील त्यांचे योगदान आणि सीमेवर बजावण्यात येणाऱ्या कर्तव्याची माहिती दिली. देशाच्या सीमेवर वाळवंटातील कडक उन्हाचा सामना असो किंवा सियाचीनसारख्या अतिशय प्रतिकूल आणि गोठवून टाकणाऱ्या थंडीचा, भारतीय जवान देशाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र तैनात असतात.
आपल्या वैयक्तिक सुख-दुःखांचा त्याग करून ते देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य देतात, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.यानंतर विद्यार्थ्यांनी आणि संचालिका सौ. अंकिता श्रीराज डेरे यांनी उपस्थित माजी सैनिकांना प्रातिनिधिक स्वरूपात राखी बांधून रक्षाबंधनाचा स्नेहबंध जपला. विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने तयार केलेल्या राख्या स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेचे अध्यक्ष व सदस्यांकडे सुपूर्द केल्या, जेणेकरून त्या राख्या सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांपर्यंत पोहोचविता येतील.

विशेष म्हणजे, डेरे स्कूलमध्ये मागील पाच वर्षांपासून ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सैनिकांपर्यंत राख्या पोहोचवून रक्षाबंधनाच्या निमित्ताने सीमेवरील जवानांशी आपुलकीचा आणि कृतज्ञतेचा बंध निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. या कार्यक्रमातील कमांडो तथा माजी सैनिक लक्ष्मण ढोले हे कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले आहेत ही विशेष बाब विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना सैनिकांच्या जीवनातील आव्हाने आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व अधिक जवळून समजले.
यावेळी उपस्थित माजी सैनिकांनी विद्यार्थ्यांना देशप्रेम, शिस्त, राष्ट्रनिष्ठा आणि सैनिकांच्या त्यागाची जाणीव करून दिली. सैनिकांच्या त्यागाची आठवण करून देताना उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली. यानंतर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा विविध देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि वातावरण उत्साहपूर्ण झाले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीच्या भावनेवर आधारित योग-नृत्याची आकर्षक कला सादर केली. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाला उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. कला, संस्कार आणि राष्ट्रभक्ती यांचा सुंदर संगम या सादरीकरणातून पाहायला मिळाला.
स्वराज्य सैनिक कल्याण संस्था सैनिकांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्यासोबतच ‘सैनिकांना दीपावली मिठाई भेट’, ‘एक दिवा सैनिकांसाठी’, शहीद जवानांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण, कारगिल विजय दिवस, कारगिल विजय उद्यान, शेतकरी व महिला सक्षमीकरण आदी सामाजिक उपक्रम राबवित आहे. तसेच संस्थेच्या वतीने, ‘वर्दी उतरली पण सैनिक धर्म नाही’ – सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत राहण्याचा संदेश दिला. ह्या संस्थांतर्गत ह्यावर्षी 25,000 राख्या संकलन करून सैनिकांसाठी सीमेवर पाठवण्यात आल्या आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका संगीता घुले यांनी केले, पाहुण्यांची ओळख शिक्षिका सुरेखा कोटकर यांनी करून दिली, तर आभार प्रदर्शन शिक्षिका अर्चना सातपुते यांनी केले. ह्या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. भानुदास जी. डेरे, उपाध्यक्ष ॲड. श्रीराज भानुदास डेरे, संचालिका अंकिता श्रीराज डेरे, माजी सैनिक, डेरे शाळेचे प्राचार्य सुनीलकुमार शुक्ला, उपप्राचार्य (प्राथमिक) हरजिंदर कौर बत्रा, शैक्षणिक प्रभारी प्रज्ञा कुलकर्णी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकवर्ग उपस्थित होता.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या मनात सैनिकांविषयी आदर, कृतज्ञता आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजविणारा हा उपक्रम ठरला. ‘एक राखी सैनिकांसाठी’ या उपक्रमातून सीमेवर तैनात असलेल्या जवानांना आपण त्यांच्या कुटुंबापासून दूर असलो तरी संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे, हा प्रेमाचा आणि विश्वासाचा संदेश देण्यात आला.







