संपादकीय: सहदेव जाधव
आरोग्य विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बॉम्बे नर्सिंग ऍक्ट चे नियम धाब्यावर बोगस कागदपत्रे बनवून थाटलेत हॉस्पिटल.. कुठलाही प्रशिक्षित स्टाफ नसताना रुग्णांच्या जीविताशी खेळ
अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर, नगर सह नगर शहरातील अनेक भागात बोगस डॉक्टरांचा धुमाकूळ सुरु आहे. बॉम्बे नर्सिंग ऍक्ट च्या नियमांचे उल्लंघन करून फक्त पैसे कमवण्याचा हेतू ठेऊन टोलेजंग हॉस्पिटल उभे केले आहे.

विशेष करून ग्रामीण भागात काही बी एच एम एस ही होमिओपॅथी पदवी असताना देखील ऍलोपॅथीचे औषधं वापरत असल्याचे आढळून आले आहे. परंतू आरोग्य विभाग मात्र फक्त तक्रार आली तरच चौकशी करणार का? आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उशाला असे डॉक्टर प्रॅक्टिस करत असताना हे अधिकारी यांना पाठीशी घालत आहेत असा समज सुज्ञ नागरिकांचा झाला आहे.
संगमनेर तालुक्यात असाच एक प्रकार आढळून आला आहे. तालुक्यातील जाखुरी या गावात बी एच एम एस ही होमिओपॅथी पदवी असलेला डॉक्टर सर्रास ऍलोओपॅथी ची प्रॅक्टिस करत असल्याचे निदर्शनास आले. एका सुज्ञ नागरिकांनी केलेल्या तक्रारी वरून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते. परंतू अद्याप संगमनेर तालुका अधिकारी यांच्याकडून कुठलीही माहिती प्राप्त झाली नाही. हा चौकशी अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांना प्राप्त होणे गरजेचे होते परंतू हा अहवाल अद्याप पोहचला नसल्याने ही कारवाई फक्त कागदावरच असेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पाथर्डी तालुक्यात देखील असाच प्रकार समोर आला आहे. एका डॉक्टर ने थेट ग्रामपंचायत चा नाहरकत दाखला बनवून दवाखाना सुरु केला. स्वतःचेच मेडिकल थाटून ऍलोओपॅथी उपचार देत असल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर रुग्णांना सेवा देताना बॉम्बे नर्सिंग होम कायद्याचे प्रमाणपत्र देखील संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. याच डॉक्टरला जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कुठलीही परवानगी नसताना पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी या ठिकाणी नामफलक लावून बेकायदेशीर दवाखाना सुरु केला म्हणून संबंधित डॉक्टरवर कारवाई चा फास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आवळला आहे.
जिल्ह्यातील काही तालुका अधिकाऱ्यांची जबाबदारी संशयास्पद
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार काही बोगस डॉक्टर करत आहेत. अनेक वर्षांपासून परप्रांतीय डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल थाटले आहे. विशेष म्हणजे यांच्याकडे कुठलाही परवाना नसताना फक्त स्थानिक राजकीय पुढाऱ्यांमुळे यांनी कायदा पायदळी तुडवला आहे. बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून सर्रास ओ पी डी चालवत आहेत. तालुका अधिकारी मात्र अशा या बोगस डॉक्टरांकडे सोईस्कर दुर्लक्ष्य करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे तालुका अधिकाऱ्यांनी सर्रास कारवाई करून बोगस डॉक्टरांवर कारवाई चा बडगा उचलला पाहिजे. उलट गावातील मुख्य ठिकाणी बोगस डॉक्टर व बॉम्बे नर्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केलेले डॉक्टर आपला व्यवसाय थाटून आहेत. यांच्यावर हे आरोग्य अधिकारी का कारवाई करत नाहीत हा देखील संशोधनाचा विषय आहे.

सहदेव जाधव: संपादक, राजसत्ता न्यूज मीडिया ग्रुप, महाराष्ट्र






