बालवारकऱ्यांच्या गजराने जुना अकोले बायपास रोड दुमदुमला; अकोले बायपास येथील विठ्ठल मंदिरात आरती करून राजगिरा लाडूंचे वाटप!
संगमनेर (प्रतिनिधी):
आज दिनांक २४ जुलै २०२६ रोजी संगमनेर येथील ‘डॉ. भानुदास जी. डेरे इंग्लिश मिडीयम स्कूल & ज्युनिअर कॉलेज, गुंजाळवाडी’ मध्ये आषाढी एकादशी सण निमित्त अत्यंत उत्साह, भक्तिभाव आणि पारंपरिक थाटात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत भव्य पायी आषाढी दिंडी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

श्री विठ्ठल-रुक्मिणी पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या संचालिका मा. सौ. अंकिता श्रीराज डेरे मॅडम यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी संपूर्ण परिसर ‘राम कृष्ण हरी’ च्या जयघोषाने भारावून गेला होता. पूजनानंतर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भजन, अभंग, लेझिम नृत्य आणि विठुरायाची महाआरती सादर केली. शाळेच्या प्रांगणातून निघालेली ही आषाढी दिंडी पाहण्यासारखी होती. हातामध्ये भगव्या पताका व ध्वज, गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळावर टिळा आणि पारंपरिक पोशाखात सज्ज झालेले विद्यार्थी “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम” असा जयघोष करत होते. या बालवारकऱ्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. जणू काही पंढरपूरच संगमनेरमध्ये अवतरले आहे, असा भास उपस्थितांना होत होता.

शाळेच्या प्रांगणातून निघालेली ही भव्य दिंडी जुना अकोले बायपास रोड ने मार्गस्थ होत अकोले बायपास येथील विठ्ठल मंदिरात पोहोचली. मंदिरात सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी श्री विठ्ठलाची पूजा आणि आरती केली. आषाढी एकादशीच्या औचित्य साधून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व भाविकांना राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दिंडी पुन्हा अतिशय शिस्तबद्धपणे शाळेत परतली. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी या बालवारकऱ्यांचे दर्शन घेतले व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. या सोहळ्यासाठी संगम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. भानुदास जी. डेरे सर, उपाध्यक्ष ॲड. श्रीराज डेरे सर, संचालिका अंकिता श्रीराज डेरे मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सुनिलकुमार शुक्ला सर, उपमुख्याध्यापक हरझिंद्र कौर बत्रा मॅडम, इन्चार्ज प्रज्ञा कुलकर्णी मॅडम व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेची सेलिब्रेशन समितीचे सदस्य अर्चना सातपुते, सुरेखा कोटकर तसेच शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.






