संगमनेर :प्रतिनिधी : संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक भव्यदिव्य स्वरूपात उभारण्यात यावे, यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी नागरिक, महायुती पदाधिकारी आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेतला आहे. सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने संगमनेर बसस्थानक परिसरात स्मारकासाठी ४ मीटर × ६ मीटर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असला, तरी एवढ्या मर्यादित जागेत स्मारक उभारण्याऐवजी किमान २२०० चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वाढीव जागेचा निर्णय होत नाही तो पर्यंत अश्वारूढ पुतळा उभारण्याची नगरपालिका प्रशासनाने घाई करू नये, अशी मागणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे नगर परिषद प्रशासनाला केली आहे संगमनेर शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेला साजेसे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारावे, ही शिवप्रेमी नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांची अनेक वर्षां पासूनची मागणी आहे.

या मागणी साठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.या पाठपुराव्या नंतर राज्य परिवहन महामंडळाने संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी ४ मीटर × ६ मीटर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र, एवढ्या कमी जागेत स्मारक उभारणे योग्य होणार नसून स्मारक भव्य स्वरूपात उभारण्या साठी२२००चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी २२ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे केली आहे.
वाढीव जागेच्या मागणीसाठी आ. अमोल खताळ यांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, प्रशासकीय स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा आशावाद महायुतीचे ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, प्रकाश राठी, रामभाऊ जाजू, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. यावेळी आर पी आय शहराध्यक्ष कैलास कासार, युवासेना उपजिल्हा प्रमुख सौरभ देशमुख, भाऊ जाखडी, अंकुश केसेकर, नामदेव गुंजाळ, दिलीप रावळ, भारत गवळी, राजेंद्र सांगळे, दिनेश सोमाणी, दीपेश ताटकर, रवी म्हस्के, अभिजीत पुंड, शशांक नामन, योगेश सूर्यवंशी, पूनम दायमा, रेखा गलांडे, संगीता पुंड, सपना जाधव, आरती पगारे, सुशील शेवाळे, सार्थक शेवाळे, वरद बागुल, मनोज जुंदरे, यांच्यासह महायुती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूरच्या धर्तीवर संगमनेरमध्ये भव्य स्मारकाची मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक मोठ्या स्वरूपात उभारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर संगमनेर शहरातही ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेला साजेसे असे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी भावना शिव प्रेमी नागरिकांची आहे.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक राजकीय श्रेयाचा विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जागेचा प्रश्न हा कोणत्या ही राजकीय पक्षाच्या श्रेयाचा विषय नाही. संगमनेर तालुक्याला असलेला ऐतिहासिक वारसा, संस्कृती परंपरा याला साजेशी असे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वैभवाला साजेसे स्मारक उभारले जावे अशी महायुती तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना व शिवप्रेमींची भावना आहे.






