संगमनेर : संगमनेर आगारात नुकत्याच दाखल झालेल्या पाच राजमाता जिजाऊ स्मार्ट बसपैकी दोन बस संगमनेर–साकूर मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या निर्णयामुळे साकूर पठारभागातील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

या नव्या स्मार्ट बससेवेचा सर्वाधिक लाभ विद्यार्थी, नोकरदार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणार असून, दैनंदिन प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होणार आहे.
राजमाता जिजाऊ स्मार्ट बसमध्ये आरामदायी पुशबॅक आसने, प्रत्येक आसनाजवळ मोबाईल चार्जिंग पॉईंट, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, जीपीएस-आधारित लाईव्ह ट्रॅकिंग, एलईडी माहिती प्रदर्शन प्रणाली, प्रशस्त सामान ठेवण्याची सुविधा तसेच आकर्षक आणि आधुनिक इंटिरिअर अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षिततेसह दर्जेदार प्रवासाचा अनुभव मिळत आहे.

दरम्यान, संगमनेर आगारात आतापर्यंत एकूण १५ नवीन बसेस दाखल झाल्या असून, त्यामुळे तालुक्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.या निर्णयामुळे साकूर पठारभागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आमदार अमोल खताळ पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल प्रवाशांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.





