‘येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या’! या म्हणी प्रमाणे अनुभव येऊ नाही हीच सामान्य जनतेची अपेक्षा
संपादकीय :सहदेव जाधव
संगमनेर तालुक्यातील पठार भागासाठी घारगाव पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील वाढत्या भौगोलिक विस्तार आणि प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने निर्मिती करण्यात आली. प्राप्त माहिती नुसार सुमारे सत्तर ते ऐंशी हजार लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी हे पोलीस ठाणे कार्यरत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घारगाव पोलीस ठाण्याची निर्मिती २०१० च्या सुमारास करण्यात आली. संगमनेर तालुक्याचा पठार भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुमारे ४७ ते ५० गावांच्या सुरक्षेची जबाबदारी या पोलीस ठाण्यावर आहे.
या पोलीस ठाण्यात १ पोलीस निरीक्षक (PI), २ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI/PSI) आणि सुमारे ३० ते ३५ पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ मंजूर आहे. पण प्रत्यक्षात येथे अपूर्ण स्टाफ दिसून येतो. तुटपुंज्या स्टाफ मुळे या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढत आहे. अपुरा पोलीस स्टाफ वाढत्या गुन्हेगारीचे कारण असले तरी या पोलीस ठाण्याला मिळालेला अधिकारी हे देखील वाढत्या गुन्हेगारी मागचे एक कारण आहे. पठार भागात वाढते अवैध धंदे हे या गुन्हेगारी मागचे मूळ कारण आहे.
घारगाव पोलीस ठाण्यात सण 2019 पासून खमका पोलीस अधिकारी मिळाला नाही. त्यामुळे घारगाव पोलीस ठाणे हे जनतेसाठी की अवैध धंद्याच्या सेवेसाठी अशीच धारणा दिवसेंदिवस होत चालली आहे. स्थानिक गुन्हे शाखेत काम केलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी घारगाव पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून काम पाहिले. जवळपास एक वर्ष घारगाव पोलीस ठाण्याची जबाबदारी त्यांनी बघितली. स्थानिक गुन्हे शाखेचा अनुभव येथे कामा येईल असे वाटत होते. मात्र अवैध व्यवसाय आणखीनच बोकळाला. हेमंत थोरात यांनी घारगाव पोलीस ठाण्यात वावरताना एक राजकीय नेता असल्यासारखं वावरत होते. विशेषतः आपल्या शासकीय गाडीत वाळू तस्करांना घेऊन गावात मिरवत होते, त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना बळकटी मिळत गेली, साकूर भागात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी राजरोस सुरु आहेच पण त्याबरोबरच खुलेआम गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात तर गांजा तस्करी व काही प्रमाणात मटका जुगार या पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुरळक सुरु आहे. नवीन येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या वर्दीची इज्जत ठेवावी अशी मागणी संपूर्ण पठारभाग करत आहे.
नवीन पोलीस अधिकाऱ्यांसमोरील आवाहन
घारगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी आपली बदली अहिल्यानगर येथील एम आय डी सी पोलीस ठाण्यात करून घेतली, आणि येथील रिक्त झालेल्या जागेवर बाबासाहेब बोरसे यांनी या पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतली आहे. आता नवीन येणाऱ्या या पी.आय.बाबासाहेब बोरसे साहेबांसमोर अनेक आवाहने असणार आहे…. ती ते कशा पद्धतीने हाताळतात याकडे पठार भागाचे लक्ष्य लागून राहिले आहे.
1)अवैध धंद्यांचा बिमोड करणं
पठार भागात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होते, यात पठार भागात दोन मोठे माफिया या भागात आहे. अनेकदा त्यांच्यावर कारवाई झाली, परंतू जामीनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांनी आपला हा धंदा सुरूच ठेवला, त्यांचे अनेक हस्तक त्यांची जबाबदारी पार पाडतात. पोलीस प्रशासनातील काही लोकांशी असलेली जवळीकता व काही राजकीय पुढऱ्यांच्या हितसंबंधामुळे हे माफिया कधी आत कधी बाहेर राहून आपला हा व्यवसाय बिधास्त चालवत आहे. साकूर व घारगाव बोटा येथे तुरळक प्रमाणात गांजा विक्री केली जाते. याची माहिती घारगाव पोलिसांना नक्कीच आहे. परंतू कारवाई करायला कुणीही अधिकारी कधीच पुढे आला नाही. गावठी दारु देखील ठराविक ठिकाणी बनवून विकली जाते तेथे देखील घारगाव पोलीस प्रशासनाने काहीही कारवाई केलेली नाही. तशी अद्याप पर्यंत त्यांची मनस्थिती दिसली नाही. जुगार- मटका या अवैध धंद्याना देखील मोठ्या प्रमाणात अभय मिळत गेले, ते आजही सर्रास सुरु आहेत. पुणे जिल्हाची सिमा संपताच संगमनेर तालुक्याच्या वेशीवर बोटा परिसरात धाब्यावर अवैध दारु विक्री होते, तर काही ठिकाणी देहविक्री व्यवसाय देखील सुरु आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या अवैध धंद्याना चाप लावणे या येणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर मोठं आवाहन राहणार आहे.
2)सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा
पठार भागात मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे. पोलीस प्रशासनाचा हलगर्जी पणा यातून निदर्शनास येतो. वाळू तस्करी, चोऱ्या, दरोडे, अपघात यांच्या बद्दल माहिती देऊनही पोलीस दखल घेताना दिसले नाही. काही दिवसांपूर्वी वाळू तस्करी बद्दल पोलीस हेल्पलाईन नंबरला कॉल करणाऱ्या नागरिकलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना दिसले. फिर्याद देण्यास गेलेल्या फिर्यादीला देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. चोरीची तक्रार देण्यास गेलेल्या इसमाला उलट सुलट प्रश्न विचारले गेल्याचे देखील अनेक उदाहरणे आहेत. शेतकऱ्यांच्या वीजपंपाची होणारी चोरीला देखील आळा बसवण्यात अपयश आले आहे.

3) पोलीस ठाण्यातील राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप.?
सध्या पठार भागात स्वयंघोषित राजकीय युवा नेत्यांचा उदय झाला आहे, हे युवा नेते अनेक आरोपीना राजकीय दबाव वापरून मदत करत आहे. अनेक गंभीर गुन्हे हे या युवा नेत्याच्या हस्तक्षेपाने मिटवले जात आहेत. मागील काही दिवसांत हा युवा नेता पोलीस ठाणे चालवतो की काय असा भास पठार भागातील नागरिकांना वाटत होता. वाळू तस्करांना व अवैध धंदे करणाऱ्यांना अभय देखील या युवा नेत्याच्या दबावापोटी दिला जात आहे. विशेष म्हणजे या युवा नेत्याचे हस्तक असलेले वाळू तस्कर मागील प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या गाडीत बिनधास्तपणे मिरवताना दिसला आहे. अवैध धंद्याची वाढती मुजोरी तसेच या युवा नेत्याचा पोलीस ठाण्यात वाढता हस्तक्षेप थांबला तरच सर्वसामान्य नागरिकांस न्याय मिळणार आहे.
घारगाव पोलीस ठाण्यात सक्षम पोलीस निरीक्षकाची गरज आहे. येथे वाढता गुन्हेगारी चा आलेख बघता सिंघम पोलीस निरीक्षकाची अपेक्षा आहे. आज आलेले अधिकारी बाबासाहेब बोरसे हे येणाऱ्या काळात आम्ही मांडलेल्या आव्हानांना सामोरे जातील अशी अपेक्षा ठेऊया. नाहीतर तसेही येथील नागरिकांना पोलीस ठाणे हे असून अडचण आणि नसून खोळंबा बनले आहे. पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करून व राजकीय दबाव झुगारून कायदा सुव्यवस्था राखावी अशी अपेक्षा या लेखातून व्यक्त करूया..!







