संपादकीय: सहदेव जाधव
अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून मोठी रस्सीखेच सुरु झाली आहे. अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघावर देखील सर्व पक्ष दावा करताना दिसत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ही जागा आधी राष्ट्रवादी अजित पवार गटाची होती. परंतू आता जिल्ह्यातील समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ स्थानिक राजकारण म्हणून नव्हे, तर महायुतीतील अंतर्गत शक्तीप्रदर्शनाच्या दृष्टीनेही बघितले गेले पाहिजे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्या लक्षात घेऊन प्राथमिक स्तरावर चर्चाना उधाण आले आहे. ज्या पक्षाकडे संख्याबळ ज्यास्त आहे त्या पक्षाकडून संबंधित विधान परिषद जागेवर दावा करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि शिंदे गटाची शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये जागेसाठी चुरस लागल्याचे बघायला मिळत आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) चे जिल्हाध्यक्ष कपील पवार यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन ही जागा आपली आहे आणि येथून आपलाच उमेदवार महायुती कडून लढला पाहिजे असे पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे आग्रही मागणी केली आहे.

उमेदवारीबाबतही अनेक नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले हे इच्छुक मानले जात आहेत. ग्रामीण भागात त्यांचा संपर्क आणि संघटनात्मक ताकद लक्षात घेता त्यांचे नाव गंभीरपणे चर्चेत आहे. त्याचबरोबर आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांचेही नाव पुढे येत असून, स्थानिक पातळीवरील समीकरणांमध्ये त्यांना महत्त्वाचा पर्याय मानले जात आहे. तर भाजपकडून खासदार सुजय विखे यांचे नाव चर्चेत आहे, त्यांच्यासोबत शालिनीताई विखे पाटील यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. जिल्ह्यात सध्या भाजपचा बोलबाला आहे. भाजपचे वाढते संख्याबळ आणि संघटनात्मक प्रभाव लक्षात घेता भाजप या जागेवर जोरदार दावा करण्याच्या तयारीत आहे.

विशेषकरून भाजपकडे सर्वाधिक मतदारसंख्या असल्याने पक्षाकडून संख्याबळ आमचे, त्यामुळे जागाही आमची अशी ठाम भूमिका घेतली जाऊ शकते. डॉ.सुजय विखे यांचे सध्या संपूर्ण जिल्ह्यात जनसंपर्क आहे. त्यातच अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपले उमेदवार निवडून आणलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत भाजप डॉ सुजय विखे यांना संधी देतील असे वाटते. डॉ सुजय विखे यांच्या उमेदवारीला कुणाचा ही विरोध राहील असेही वाटत नाही. सर्व पक्षाशी असलेले हितसंबंध त्यांना फायदेशीर ठरतील. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून पारनेर (वासुंदे)सुजित झावरे यांचे देखील नाव चर्चेत आहे.

जिल्ह्यात शिंदे गट हे देखील आपली ताकद वाढवू इच्छितो. याचदरम्यान आणखी एक राजकीय चर्चा जोशात रंगली आहे. राहुरी पोटनिवडणुकीत माघार घेतलेले प्राजक्त तनपुरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेची संधी देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे अंतिम क्षणी समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, महायुतीत कोणाला प्राधान्य मिळणार आणि कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अहिल्यानगर मतदारसंघातील आकडेवारी पाहिली तर या निवडणुकीचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. या मतदारसंघात एकूण 461 मतदार आहेत. त्यामध्ये भाजपकडे सर्वाधिक 199 सदस्यसंख्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे सुमारे 50 सदस्य आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेकडे 48 सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे 35 सदस्य आहेत. विजयासाठी आवश्यक असलेला आकडा 231 मतांचा आहे. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला स्वतंत्रपणे विजय मिळवणे शक्य नसून, मित्रपक्षांचे समर्थन आणि आघाडीतील अंतर्गत समन्वय निर्णायक ठरणार आहे.
मागील वेळी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. स्व. अरुणकाका जगताप हे येथून आमदार होते. मात्र राज्यातील सत्तांतर, पक्षफुटी आणि बदललेली राजकीय समीकरणे पाहता यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. भाजप या जागेवर मजबूत दावा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसही ही जागा कायम राखण्यासाठी सक्रिय झाली आहे. त्यामुळे उमेदवारीपासून ते मतदानापर्यंत प्रत्येक टप्प्यावर राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर दक्षिण चे खासदार राहिलेले डॉ. सुजय विखे पाटील हे या जागेवर प्रबळ दावेदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीपासून ते काल झालेली राहुरी विधानसभा निवडणूक हिचे सारथ्य खुद्द डॉ सुजय यांनी केले, व ते यशस्वी करून दाखवले. अहिल्यानगर महापालिकेत देखील त्यांच्या माध्यमातून एकहाती सत्ता मिळवली. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले बाळासाहेब थोरात यांचा पराभव देखील डॉ सुजय यांनी रचलेल्या चक्रव्युहातून केला. तोच प्रकार नेवासा येथे दिसून आला. पारनेर मध्ये निलेश लंके यांच्या पत्नीचा पराभव करून लोकसभेचा वचपा काढला त्यामुळे भाजप पक्षाकडून या युवा नेत्याला संधी देण्याची वेळ आली आहे. परंतू येणाऱ्या काळात काय घडामोडी घडतात हे बघणं महत्वाचे त्यामुळे सध्या महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठका आणि स्थानिक पातळीवरील राजकीय हालचाली वाढलेल्या असून, अखेर कोणाच्या गळ्यात विधान परिषदेची माळ पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






