संगमनेर / प्रतिनिधीसंगमनेर तालुक्यातील वीज वितरण व्यवस्थेत गेल्या दीड वर्षात लक्षणीय सुधारणा झाली असून जळालेले वीज रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बदलण्याच्या प्रक्रियेला अभूतपूर्व गती मिळाली आहे. तालुक्यात सुमारे ७ हजार ५०० वीज रोहित्र आहेत. उन्हाळ्यातील तीव्र उष्णता, वाढलेला वीजभार आणि इतर तांत्रिक कारणांमुळे दरवर्षी सरासरी ७०० ते ८०० रोहित्र जळाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आमदार अमोल खताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्या कडून एक रुपयाही न घेता अवघ्या तीन ते चार दिवसात विजेचे रोहित्र बसून मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतीपंपांच्या वीजपुरवठ्यातील अडथळे कमी होण्यास मदत झाली आहे.
यापूर्वीच्या काळात जळालेले वीज रोहित्र जळाल्यानंतर नवीन रोहित्र बसविण्यासाठी शेतकर्याकडून २० ते २५ हजार रुपयांची वर्गणी गोळा केली जात होती. एवढी रक्कम जमा करूनही नवीन रोहित्र मिळण्यासाठी २० ते २५ दिवसांचा कालावधी लागत असे. परिणामी शेतीची कामे ठप्प होत असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते.मात्र, तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर गेल्या दीड वर्षात फार मोठा बदल झाला आहे. आमदार अमोल खताळ यांचा महा वितरण प्रशासनाशी सातत्याने केलेल्या समन्वयामुळे जळालेले रोहित्र बदलण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. आता शेतकऱ्यांकडून एक रुपयाही न घेता निशुल्क अवघ्या ३ ते ४ दिवसांत नवीन रोहित्र उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शेतीपंपांचा वीज पुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होत आहे.

दरम्यान, तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम व कार्यक्षम करण्यासाठीही विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांतून संपूर्ण तालुक्यात १६५ नवीन वीज रोहित्रांची उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय आमदार निधीतून आणखी २४ नवीन रोहित्र बसविण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गावांमधील कमी दाबाचा व ओव्हरलोडचा प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे.तसेच ओटीएसपी योजनेअंतर्गत आणखी ९ वीज रोहित्र बसविण्याच्या कामांना मंजुरी मिळाली असून ही कामेही लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत. वीज पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आतापर्यंत तालुक्यात सुमारे एक कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. यामुळे भविष्यातील वाढत्या वीज मागणीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक विश्वासार्ह करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संगमनेर तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकांना दर्जेदार व अखंड वीजपुरवठा मिळावा, हा आमचा प्राधान्यक्रम आहे. शेतीपंपांना नियमित वीज मिळावी, जळालेले रोहित्र तातडीने बदलले जावे आणि त्यासाठी शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार पडू नये, यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. रोहित्र बदलण्याच्या प्रक्रियेत वेग आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. भविष्यातही वीज पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत तालुक्यातील वीजविषयक समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यावर भर राहील.
अमोल खताळ( आमदार)
संगमनेर तालुक्यातील राजापूर, जवळेकडलग, धांदरफळ खुर्द, कर्जुले पठार, मांडवे, तळेगाव, हिवरगाव पावसा आदी भागांतील वीज उपकेंद्रांची क्षमता अपुरी असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे तसेच वाढत्या वीज मागणी मुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ यांनी महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे संबंधित वीज उपकेंद्रांच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील वीज खंडित होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.





