संगमनेर : वारकरी संप्रदायावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य करणारे विकास लवांडे यांच्या संगमनेर येथील प्रस्तावित व्याख्यानाला पोलीस प्रशासनाने परवानगी देऊ नये, अन्यथा उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासन यांची राहील, असा इशारा वारकरी क्रांती सेना आणि राष्ट्रीय वारकरी परिषद प्रणित वैदिक हिंदू वारकरी बहुउद्देशीय सेवा संघ यांच्या वतीने देण्यात आला आहे.
“सत्यशोधक विचारमंच” संस्थेच्या वतीने व्यापारी असोसिएशन हॉल येथे २४ मे रोजी “संतांचा वारकरी संप्रदाय” या विषयावर विकास लवांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. याच विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये केली होती. त्यामुळे वारकरी संघटनांनी या कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शविला आहे. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि संत परंपरेचा आत्मा असून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या परंपरे विषयी विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी धार्मिक भावना दुखावल्या बद्दल वाघोली पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संगमनेरला आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विकास लवांडे यांनी पुन्हा प्रक्षोभक अथवा समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लवांडे यांच्या व्याख्यानाला पोलीस प्रशासनाने परवानगी देऊ नये, अशी मागणी वारकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन लक्ष्मण महाराज पानसरे, वेणूनाथ महाराज विखे, विठ्ठल महाराज अभंग, रोहिणीताई महाराज राऊत, ज्ञानदेव महाराज पानसरे, शिवाजी महाराज खेमनर, अनिल महाराज घुले, शांताराम घुले, संभाजी घुले, भाऊसाहेब शिंदे, सुनील शिंदे, सीताराम वाघमोडे आणि मुरलीधर खताळ यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहे.







