जलसंपदामंत्री विखे पाटील आणि आ.खताळ पठार भागाला पाणी देतील
संगमनेर ( प्रतिनिधी) – चाळीस वर्षापासून सर्व सतास्थाने ताब्यात असतानाही साकूर पठार भागातील जनतेला ज्यांना पाणी देता आले नाही त्यांनी या भागात येऊन बिन पाण्याचा ऊस लावण्याचा सल्ला देऊ नयेत अशी टिका भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली आहे.
साकूर येथील मेळाव्यात पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्यावर केलेल्या टिकेचा समाचार घेताना रऊफ शेख म्हणाले की, साकूर पठार भागाला जर पाणी उपलब्ध असते तर ऊस विकास मेळावे घेण्याची वेळच तुमच्यावर आली नसती. मुळा नदीवर जे काही बंधारे झाले ते सर्व बंधारे माजी मंत्री स्व.मधुकर पिचड यांच्या कार्यकाळात झाले आहेत त्यामध्ये तुमचे योगदान काहीच नाही. माझे वडील स्व.सिराजभाई शेख हे पिचड यांचे खंदे समर्थक म्हणुन या भागात कार्यरत होते. 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचना होऊन या भागाचा समावेश संगमनेर विधानसभा मतदारसंघात झाल्यानंतर आपल्या काळात एकही नवीन बंधारा मागील सतरा वर्षांच्या काळात मुळा नदीवर बांधला गेला नाही हे आपले अपयश लोकांना माहीत आहे..त्यामुळे मुळा नदीवरील बंधार्यांचे खोटे श्रेय आपण घेऊ नये.

तसेच पिंपळगाव खांड धरणाचा प्रकल्प होत असताना आपण स्वत: राज्य मंत्रिमंडळात असताना आपल्याला या पठार भागाचा समावेश लाभक्षेत्रात करता आला नाही हे आपले योगदान पठारभागातील जनता विसरलेली नाही. पाणी नसल्यामुळे या भागा तील शेतकर्यांच्या दोन-तीन पिढ्या बरबाद झाल्या आहेत. मात्र यापुढे आता असे होणार नाही. राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री .राधाकृष्ण विखे पा.आणि आमदार अमोल खताळ पा. यांच्या माध्यमातुन उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून या साकुर पठार भागाचा पाणी प्रश्न आम्ही सोडवणारच असून याकामी नूसते आश्वासनच नाहीतर सर्व्हेक्षणाची प्रक्रीया सुद्धा पूर्ण झाली असल्याचे रऊफ शेख यांनी ठामपणे सांगितले.
साकुर पठारभागातील रद्द झालेले रस्ते आमदार अमोल खताळ पा. यांनी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या माध्यमातुन पुन्हा मंजुर करून आणले आहेत पठार भागात मोठ्या प्रमाणावरती विकासकामे सुरु केली आहेत ,त्यामुळे या रस्त्यांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आपण करु नये. अशी टीका रऊफ शेख यांनी केली.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागात आता औद्योगिक वसाहत सुद्धा होणार असल्यामुळे या भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि पठारभागाचा भाग्योदय होणार आहे. परंतु गेली 40 वर्षे तुम्हाला या भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी देता आल्या नाहीत. आता तुम्ही त्यांना काय रोजगार मिळवून देणार असा प्रश्न शेख यांनी केला आहे.
आपल्याच एका पदाधिकार्याने मागे एकदा माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये आपल्या स्विय सहाय्यकांच्या केबिनमध्ये कोण कोण ठेकेदार बसलेले असतात व कशा पद्धतीने कामकाज चालते याची माहिती दिली होती. त्यामुळे टक्केवारी कुणाची बंद झाली हे जनतेला वेगळं सांगायची गरज नाही.अजुनही बरेच काही आहे,पण ते योग्यवेळी मांडु असे रऊफ शेख म्हणाले.






