संपादकीय: सहदेव जाधव
अहिल्यानगरच्या राजकारणात प्राजक्त तनपुरे यांच्या पक्षांतराने मोठी खळबळ… शरद पवार यांच्यासह जयंत पाटील यांना मोठा झटका यामुळे बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षांतरामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या सुमारे दहा मिनिटांच्या भेटीत त्यांनी पक्ष सोडण्यामागील कारणे सांगितली आणि पक्षाने आजपर्यंत दिलेल्या संधींसाठी आभार मानले. यानंतर सुप्रिया सुळे यांनी तनपुरे यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रवेशाने जयंत पाटील नाराज
दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांचे मामा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. “प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे आमच्यासाठी धक्कादायक आहे,” असे ते म्हणाले. मात्र त्यांनी यामागे मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि विकासकामांच्या अडचणी कारणीभूत असू शकतात, असेही नमूद केले. भाजप प्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलताना प्राजक्त तनपुरे भावूक झाले होते. “माझ्यात शरद पवार आणि जयंत पाटील यांना भेटण्याची हिंमत नव्हती. पण माझ्या कार्यकर्त्यांचे राजकीय भवितव्य आणि मतदारसंघाचा विकास यासाठी हा निर्णय घेतला,” असे त्यांनी सांगितले.
पक्ष प्रवेशावर प्राजक्त तनपुरे यांचा खुलासा
भाजपमध्ये प्रवेशानंतर तनपुरे यांनी सांगितले की, विरोधी पक्षात राहिल्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील अनेक विकासकामांना अडथळे आले. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आणि मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सत्ताधारी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. आपल्यावर कोणताही दबाव नव्हता किंवा कोणतीही चौकशी सुरू नव्हती, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजकीय वर्तुळात आता प्राजक्त तनपुरे यांना भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. उद्या या जागेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे घाईघाईने उरकलेला पक्ष प्रवेश उमेदवारीचे संकेत देऊन जात आहेत.

डॉ सुजय विखे यांची चाणक्यनीती चर्चेत
एकेकाळी अजित पवार यांच्या बंडावेळी शरद पवारांसोबत ठामपणे उभे राहिलेले प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भाजपचा मार्ग स्वीकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समोर नवीन राजकीय आव्हान उभे राहिले आहे. या सर्व घडामोडीचे श्रेय्य डॉ सुजय विखे पाटील यांना जाते. डॉ सुजय विखे पाटील यांनी राहुरी विधानसभेची निवडणूक आपली चाणक्य नीती वापरत जिंकून आणली, या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ सुजय विखे पाटील यांचे विशेष कौतुक केले होते. तर प्राजक्त तनपुरे यांच्या पक्ष प्रवेशासाठी देखील डॉ सुजय विखे पाटील यांच्या रणनीतीची चर्चा जिल्ह्यातून होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढले
अहिल्यानगर जिल्ह्यात प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाने भाजपची ताकद वाढली आहे. राहुरी विधानसभा मतदार संघ देखील पूर्ण भाजपमय झाला आहे. कधीकाळी नगर जिल्हा हा शरद पवार यांचा बालेकिल्ला समजला जात होता. परंतू सध्यस्थीतीला शरद पवार यांचा जिल्ह्यातून सुफडासाफ झाला आहे. अनेक मोठे नेते शरद पवार यांना सोडून गेले आहे. कर्जत जामखेड मतदारसंघ वगळता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जिल्ह्यातून तडीपार झाला आहे. श्रीगोंदा, राहुरी, शिर्डी, शेवगाव- पाथर्डी, या मतदारसंघात भाजप एकहाती सत्तास्थानावर आहेत. तर नेवासा, कोपरगाव, अहिल्यानगर, पारनेर, संगमनेर, या ठिकाणी भाजपच्या पाठबळावर आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शत प्रतिशत भाजप बनले आहे. तर यांचे सर्व श्रेय्य हे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले जात आहे. तर डॉ सुजय विखे पाटील यांनी पक्षवाढीसाठी केलेला प्रयत्न मात्र कौतुकास पात्र ठरत आहे.






