श्रीरामपूर- सध्या महाराष्ट्रात भोंदू बाबांनी थैमान घातले आहे. अहिल्यानगर जिल्हा देखील यात पाठीमागे नाही. खरात बाबा नंतर संगमनेर चे गडगे बाबा मोठा चर्चेत आला. आता श्रीरामपूर तालुक्यात देखील असाच प्रकार समोर आला आहे. पोट दुःखीवर उपचार करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक करत, तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बेलापूर परिसरात खटकाळी भागातील तथाकथित महाराज विरुद्ध बलात्कारासह जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या भोंदू आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्यानेही सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. नाशिकचा भांदू अशोक खरात, संगमनेरचा राजेंद्र गाडगे यांचे प्रकरण गाजत असतानाच आता बेलापूर नजीकच्या बाबास अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर परिसरातील पीडित महिला सन 2023 मध्ये पोटातील अल्सरच्या त्रासाने त्रस्त होती. यावेळी बेलापूर परिसरातील खटकाळी येथील गणेश माधवराव शिंदे उर्फ गणेश महाराज हे आजारांवर उपचार करतात, अशी माहिती मिळाल्याने ती त्याच्या संपर्कात आली. सुरुवातीला लिंबू, उदी देत पाण्यात मिसळून पिण्यास सांगितले. त्यानंतर काहीसा फरक जाणवल्याचे सांगत आरोपीने महिलेकडून 15 हजार रुपयांची मागणी केली. पुढील उपचारासाठी पुन्हा येण्यास सांगितले. पाच दिवसांनी महिला पुन्हा गेल्यानंतर आरोपीने प्रसाद म्हणून खडीसाखर, पेढा व उदी मिश्रित पदार्थ खाण्यास दिला. तो घेतल्यानंतर महिलेला चक्कर आली. असा आरोप पिडीत महिलेने केला आहे. आरोपीने तिला घराच्या मागील खोलीत नेऊन दरवाजा बंद केला. तेथे पुन्हा औषधाच्या नावाखाली पेय देऊन तिची शारीरिक स्थिती कमकुवत केल्याचा आरोप असून, त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

आरोपीने फोनद्वारे धमक्या देत, उपचार पूर्ण न झाल्यास आजार वाढेल, असा धाक दाखवून महिलेला वारंवार आश्रमात बोलावले. बदनामीची भीती आणि आजार वाढण्याच्या भीतीने पीडितेला इच्छेविरुद्ध जावे लागत होते. प्रत्येकवेळी महाराज दक्षिणा म्हणून पैसे किंवा सोन्याची मागणी करत होता. आतापर्यंत सुमारे 18 ते 20 लाख रुपये घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. तसेच, ऑगस्ट 2025 मध्ये महिलेच्या घरी आणि जानेवारी 2026 मध्ये आश्रमात पुन्हा धमकावून तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. अखेर पीडित महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी भोंदू गणेश माधवराव शिंदे उर्फ गणेश महाराज याच्याविरुद्ध बलात्कार तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या भोंदूला ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा अधिक तपास श्रीरामपूर पोलीस करत आहे. दरम्यान, या भोंदू बाबाची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. आता श्रीरामपूर पोलीस या भोंदूची कसून चौकशी करत आहेत.






