संपादकीय: सहदेव जाधव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या राज्यभर प्रमुख शहराचा दौरा सुरु केला आहे. नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या त्या सहा खासदारांच्या मतदारसंघात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. आता उद्या उद्धव ठाकरे यांची शिर्डी येथे सोमवारी (दि. 29) जाहीर विराट सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर उद्धव ठाकरे आपल्या ठाकरी शैलीत खा. वाकचौरे यांचा कसा समाचार घेतात याकडे सर्व अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिर्डीकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर भगवे ध्वज, आकर्षक स्वागतकमानी, पताकांची सजावट सुरू असून, शिर्डी भगवेमय झाले आहे. सर्वत्र जल्लोष सुरू असून, ठिकठिकाणी शिवसैनिकांची लगबग पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिर्डीतील सभेत उद्धव ठाकरे गद्दारांवर काय हल्लाबोल करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून शेकडो चारचाकी, दुचाकी आणि बसचे ताफे शिर्डीकडे रवाना करण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शक्तीचे विराट प्रदर्शन घडवून आणण्यासाठी शिवसैनिक दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.

सोमवारी (दि. 29) साकुरी येथील साई किमया लॉन्स येथे होणाऱ्या सभेसाठी शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. गावागावांत बैठकांचे सत्र, वाहन नियोजन, संपर्क मोहीम आणि जनजागृती सुरू आहे. शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला भगिनी, तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सभेचे निमंत्रण पोहोचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण जिह्यातील राजकीय विरोधकांचे लक्ष आता शिर्डीकडे लागले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते, जगदीश चौधरी, उपजिल्हाप्रमुख अमर कातारी, शहरप्रमुख अमित चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक सभेच्या तयारीला लागले आहेत.
सध्याच्या राजकीय घडामोडींवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करतानाच जनतेच्या प्रश्नांवरील भूमिका आणि आगामी राजकीय रणनीती याबाबत उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे शिर्डीतील विराट सभा राज्याच्या राजकारणाला नवी कलाटणी देणारी आणि आगामी राजकीय समीकरणात बदल करणारी ठरेल, असा विश्वास शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे काय बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. सध्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थे चा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अवैध धंदे बोकळले आहेत. वाळू तस्कर मोकाट आहेत यात सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी वाळू तस्करीत सहभागी आहेत. महसूल अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर दबाव टाकून अवैध धंदे बिनधास्त चालवले जात आहेत. पत्रकारांनी बातमी केल्यानंतर पत्रकारांच्या घरात घुसून पिस्तूल रोखून गोळ्या घालण्याची धमकी दिली जात आहे. तर पक्षाचे पदाधिकारी हे पत्रकारांना ठोकून काढा, हातपाय तोडा अशी सुपारी देत आहे. तशी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. तर काही डॉक्टर लोकांना खोटे सर्टिफिकेट देण्यास दबाव आणला जात आहे. तशीच वाळू व गौण खनिज तस्करी वर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कामगार तलाठी यांना कसे धमकावले जाते याची कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्याला राजश्रय देणाऱ्या पक्षांबद्दल उद्धव ठाकरे बोलतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.







