संगमनेर तालुक्यातील पठार भागात अवैध धंद्याना ऊत..नक्की राजश्रय कुणाचा गुटखा, गांजा, मटका- जुगार, आणि गौण खनिज तस्करांचा माफियाराज/ पोलीस प्रशासन हतबल? राजकीय दबाव की अर्थपूर्ण संबंध
संपादकीय /सहदेव जाधव
संगमनेर तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था सध्या बिघडली गेली आहे. गुटखा, गांजा, मटका-जुगार, कत्तलखाने तसेच गौण खनिज तस्करांची मुजोरी सध्या वाढली आहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे या माफियानी काढले आहे. वारंवार तक्रारी करून देखील यांच्यावर कारवाई केली जात नाही. खुलेआम गुटखा विक्री होत आहे. पत्रकार म्हणून आम्हाला गुटखा माफियाचे गोडाऊन माहिती होतात तर मंग पोलीस प्रशासन तसेच फूड अँड ड्रग्स च्या हाताला गोडाऊन का लागत नाही हा संशोधनाचा विषय बनला आहे. काल अपघाताने सापडलेला लाखोंचा गुटखा पठार भागातील माफियांची ओळख करून देणारा आहे. मागील काही दिवसांपूर्वी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव देपा ग्रामपंचायत हद्दीत बहुचर्चित गुटखा माफिया प्रभाकर गुळवे याला पुन्हा एकदा पकडण्यात आले यावेळी त्याच्याकडून काही प्रमाणात गुटखा हस्तगत करण्यात आला. ही कारवाई संशयास्पद असल्याची चर्चा पठार भागात मोठ्या प्रमाणात झाली. ही कारवाई संशयास्पद का? यामागे देखील मोठी कारणे आहेत. याच गुटखा माफियामुळे पोलीस प्रशासन व फूड अँड ड्रक्स अधिकारी कर्मचारी बदनाम आहे. पठार भागात युसूफ चौगुले व प्रभाकर गुळवे हे अवैध गुटखा व्यवसायातील माफिया आहेत. संपूर्ण परिसरात हे गुटखा रॅकेट चालवतात. परंतू आजपर्यंत प्रशासनाला यांचे गोडाऊन मिळून आलेले नाही. काल पहिल्यांदाच अपघात झाला म्हणून युसूफ चौगुले चा मोठा लाखोंचा गुटखा सापडला गेला.

संगमनेर तालुक्यातील पठार भाग हा गुटखा माफिया बरोबरच वाळू तस्कर, गांजा तस्करी मध्ये देखील मागे नाही. फक्त पोलीस प्रशासनाचे पाठबळ व राजकीय आशीर्वाद यामुळे हे गुन्हे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. या काळ्या सम्राज्याचे उगमस्थान संगमनेर तालुक्यातील पठार भाग असल्याचे वारंवार समोर येत आहे. अनेकदा यावर काहींनी गुप्तपणे घारगाव पोलिसांना किंवा 112 हेल्पलाईन नंबरवर तक्रारी केल्या आहेत परंतू या तक्रारदारांना कायम निराशा पदरी पडली आहे. उलट तक्रारदाराचे नाव संबंधिताना कळवले जाते यातून या तक्रारदारांच्या जीवितास धोका निर्माण झालेला निदर्शनास आले आहे.
मुळा नदीतून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा होत आहे. याबाबत आम्ही वृत्त प्रसिद्ध केले होते. परंतू याचाच रोष धरून पारनेर तहसीलदार यांनी संबंधित वाळू तस्करांना नोटीसा काढत आमच्या नावाचा जाहीर उल्लेख केला होता. यामुळे सर्व वाळू तस्करांचा रोष आमच्यावर ओढवला गेला. वाळू, मुरूम तस्करीला राजश्रय मिळत असल्याचे मागील काही प्रकरणातून समोर आले आहे. मागील काही वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील पठारभाग हा अवैध कृत्यांचा बालेकिल्ला बनला आहे.
राजकीय क्षेत्रातून अवैध धंद्याना पाठबळ दिले जात असल्याचे संपूर्ण तालुक्याने काही दिवसांपूर्वी बघितले. हॉस्पिटल मधून गंभीर गुन्हे दाखल करून घेण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी सर्टिफिकेट देण्यासाठी कसा राजकीय दबाव वापरला गेला हे पण आपण बघितले. एवढेच नाही तर वाळू तस्कर व मुरूम तस्कर यांच्यावर कारवाई करायची नाही म्हणून महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील झालेला आपण बघितलंय. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर दबाव टाकण्यासाठी एका राजकीय पदाधिकाऱ्यांची उठाठेव आपल्या समोर काही दिवसांपूर्वी आली आहे.
पठार भागात सरकारी यंत्रणा या राजकीय पुढऱ्यांच्या दावणीला बांधली गेली का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पठार भागात राजकीय पुढऱ्यामुळे अनेकांवर अन्याय झाला आहे. परंतू पिडीत व शोषित व्यक्ती या पुढऱ्याच्या दहशतीमुळे अन्याय सहन करतो आहे. पठार भागातील गुन्हेगारीला चाप लावायचा असेल तर अशा पुढऱ्यांना पोलीस ठाण्यात येण्यास बंदी घातली गेली पाहिजे. प्रत्येक गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी गावपुढारी आघाडीवर असतो. सध्या पठार भागात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले आहे. घारगाव पोलीस ठाण्याची सुनियोजित फळी नवीनच दाखल झालेले पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना बसवावी लागणार आहे.
पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांची जबाबदारी
घारगाव पोलीस ठाणे हे पोलीस निरीक्षक पदाच्या प्रतीक्षेत होते. जवळपास एक वर्ष हा कारभार सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी पाहिला. आणि याच कालावधीत सर्वात ज्यास्त गुन्ह्यांची मालिका सुरु झाली. व अवैध धंद्याना येथे ऊत आला. वाळू तस्कर थेट पोलीस गाडीत फिरायला लागले. वाळूतस्कर, गुटखाकिंग, गांजावाले याच्याबरोबर पोलिसांचे खुलेआम चहा पान सुरु झाले. धाब्यावर खुलेआम मद्यविक्री सुरु झाली. हा सर्व कारभार सरळ करायचे काम आलेले पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना करावा लागणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी वाढते हितसंबंध आपण लक्षात घेऊन यांची बदली करणे देखील गरजेचे बनले आहे. तसा प्रस्ताव आपण वरिष्ठाना कळवला पाहिजे. अन्यथा पठार भाग हा गुन्हेगारांचे माहेरघर तर अवैध धंद्याचे हब बनल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण खाकी ची प्रतिष्ठा व ताकदीची ओळख करून द्याल अशी अपेक्षा..! क्रमशः








