संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील जोर्वे गट हा तसा माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला समजला जात होता. याआधी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत थोरात यांचेच वर्चस्व या गटात टिकून राहिले आहे. परंतु जसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. तशी थोरात गटाला मोठी गळती लागल्याचे चित्र सध्या निदर्शनास येत आहे.

काही दिवसांपूर्वी आश्वी येथे राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या उपस्थितीत वाघापूर येथील थोरात कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे यांसह समर्थक कार्यकर्त्यांनी थोरात गटाला सोडचिठ्ठी देत विखे गटात प्रवेश केला. या मोठ्या धक्क्यातून थोरात गट सावरत नाही तेच आता पिंपरणे येथील कामधेनू दूध संस्थेचे चेअरमन व दलित चळवळीचे नेते प्रकाश उर्फ काका गायकवाड यांसह पिंपरणे ग्रामपंचायतीचे सरपंच नारायण मरभळ, ग्रा.पं.सदस्य उत्तम राहिंज, ग्रा.पं.सदस्य निलेश चत्तर, ग्रा पं.सदस्य श्रीकांत बागुल, सामाजिक कार्यकर्ते राहुल बागुल, नानासाहेब गायकवाड, सुरेश गाडेकर, प्रशांत राहिंज, शुभम राहिंज यांनी जोर्वे परिसरात ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटिल साहेब यांच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांना प्रभावित होऊन आमदार खताळ पाटील यांच्या काम करण्याच्या शैलीला प्रभावित होत नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे.

हा प्रवेश थोरात गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या कार्यकर्त्यांचा प्रवेश हा शिवसेनेत जरी झाला असला तरी हा भाजपचे अध्यक्ष गोकुळ दिघे यांचाच मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. होणाऱ्या प्रवेशांवरून भाजपचे अध्यक्ष गोकुळ दिघे यांची राजकीय मुत्सद्देगिरी सिद्ध होताना दिसत आहे. या प्रवेशाने आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकीय समीकरण नक्कीच बदलणार असल्याचे बोलले जात आहे.
मागील निवडणुकांत या गटात जरी थोरात यांचे वर्चस्व कायम राहिलेले असले तरी आता तशी परिस्थिती नाही आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची मोठी फळी तालुक्यात उभी राहिली आहे. त्यांच्या काम करण्याच्या शैलीला प्रभावित होत अनेक नवतरुण कार्यकर्ते नव्याने जोडले जात आहेत. यातच जोर्वे जिल्हा परिषद गटातील बरीचशी गावे ही राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदार संघातील आहेत. या गावात विखे पाटील यांची ही मोठी ताकद आहे त्यातच आता जोर्वे गटातीलच असलेल्या अंभोरे गणात थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सोडचिठ्ठी देत आमदार अमोल खताळ पाटील यांचे नेतृत्व स्वीकारल्याने झालेला प्रवेश हा थोरात गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अजून वेळ आहे तेच मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सोडचिट्टी देत आहेत. त्यामुळे येणारा काळ हा थोरातांना धक्कातंत्र ठरणार असल्याची चर्चा जोर्वे गटात सुरु आहे.






