संगमनेर: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती म्हणूनच निवडणुका लढण्याची चर्चा वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी सत्तेतील तिन्ही पक्षांनी मिळून सहा राज्यस्तरीय सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
या समितीने घेतलेल्या निर्णयावर वरिष्ठ नेत्यांचा शिक्का लागल्यानंतर आदेश प्रसिद्ध होतील, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. मंत्री झिरवाळ शनिवारी (ता. ८) संगमनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीस उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

झिरवाळ म्हणाले, “आगामी नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षांतर्गत संवाद सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मंत्री, आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी यांना विविध जिल्ह्यांमध्ये जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. ते तेथील कार्यकर्त्यांच्या भावना आणि मते जाणून घेत आहेत. त्यातून मिळालेल्या अभिप्रायावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील. सध्या राज्यात महायुतीच्या बाजूने चांगले वातावरण आहे. तिन्ही पक्षांमध्ये समन्वयाने काम सुरू आहे. मात्र, काही अपवादात्मक परिस्थितीत गरज पडल्यास काही ठिकाणी मित्रत्वाच्या दृष्टीने किंवा स्वतंत्रपणेही निवडणूक लढवण्याचा विचार होऊ शकतो.

शेतकरी, तरुण, महिला आणि विद्यार्थी वर्गासाठी सरकारने विविध योजना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना संकटात मदतीचा हात देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकारने प्राथमिक टप्प्यावर पीककर्ज माफीचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी ३० जूनपर्यंत पूर्ण होईल, असा आम्हाला विश्वास आहे. लोकहिताच्या प्रश्नावर लक्ष द्यावे. निवडणुकांच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोपांची सरबत्ती असतेच. परंतु, विरोधकांचा मुख्य निशाणा नेहमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर असतो. त्यांच्यावर वेळोवेळी उगाचच आरोप केले जातात. जनतेतही चर्चा आहे की, अजितदादांना लक्ष्य केल्याशिवाय विरोधकांकडे बोलायला काहीच उरत नाही. या सर्व आरोपांवर उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे या मुद्यावर आता राजकारण करण्याऐवजी लोकहिताच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवे, असेही झिरवाळ यावेळी म्हणाले.
बैठकीवेळी जिल्हाध्यक्ष कपिल पवार, सरूनाथ उंबरकर, श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, वैशाली राऊत, प्रवीण कानवडे यांच्यासह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसह इच्छुक उमेदवार उपस्थित होते.






