संपादकीय :सहदेव जाधव
संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आपण विश्लेषण करत आहोत. यामध्ये आपण तळेगाव, जोर्वे, आश्वी गटांचे प्राथमिक विश्लेषण केले आहे. संभाव्य उमेदवारांना जनतेतून किती पसंदी मिळते हे देखील आपण बघणार आहोत. नगरपालिका व नगरपरिषद यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 2 डिसेंबर रोजी निवडणुका पार पडणार आहेत तर 3 डिसेंबर रोजी निकाल होणार आहेत. लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. याच प्राश्वभूमीवर आपण मागे काही गटांचे विश्लेषण केले आज आपण तालुक्याच्या राजकीयदृष्ठ्या अतिशय महत्वाचा असलेल्या साकूर गटाचे विश्लेषण करणार आहोत.
साकूर गट हा आज पर्यंत काँग्रेस चा बालेकिल्ला समजला जातो. परंतु मागील विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेस चे अनेक लाभार्थी आता महायुतीकडून लाभ घेण्यासाठी महायुतीच्या गोटात दाखल होत आहेत. त्यामुळे काहीअंशी काँग्रेस ला फरक पडणार आहे. साकूर जिल्हा परिषद गट हा तसा ओबीसी बहुल गट आहे. आणि अशातच येथील जिल्हा परिषद गट हा जिल्हा परिषदेला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण आहे. त्यामुळे येथून बडे नेते सर्वच इच्छुक आहेत. तर पंचायत समिती साकूर गण हा ओबीसी महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. तर पिंपळगाव गण मात्र सर्वसाधारण व्यक्ती साठी आरक्षित आहे. त्यामुळे या गट आणि गणातून मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत.

साकूर जिल्हा परिषद गटातील इच्छुक
काँग्रेस कडून जिल्हा परिषद गटासाठी प्रबळ दावेदार साकूर चे जेष्ठ नेते शंकर पाटील खेमनर यांचे खंदे समर्थक बाळासाहेब भाऊसाहेब सागर हे आहेत तर ओबीसी कार्ड खेळले गेले तर भगवान उद्योग समूहाचे आदिकशेठ खेमनर, संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर यांना देखील संधी मिळू शकते. तर महायुती कडून गुलाब भोसले हे इच्छुक असून त्यांनी या गटात नागरिकांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. तर भाजप चे जेष्ठ नेते तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे गेल्या 40 वर्षांपासून खंदे समर्थक असलेले बाळासाहेब कोंडाजी खेमनर हे संभाव्य उमेदवार असू शकतात. त्यांनी देखील गटामध्ये आपल्या गाठी भेटी वाढवल्या आहेत. किरण भागवत हे देखील इच्छुक असल्याने येथून उमेदवारी देताना महायुतीची कसरत होणार आहे. त्यामुळे महायुती मध्ये नेत्यांना कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी मोठी कसब पणाला लागणार आहे.
साकूर गणातून इच्छुक भरपूर पण येथून सर्व पक्षीय अलबेल
साकूर गण हा महिला ओबीसी असा आरक्षित झाल्याने येथून महिलांना संधी मिळणार आहे. यात काँग्रेस किंवा महायुती मधून कार्यकर्त्यांच्या ‘सौभाग्यवती’ ना संधी मिळू शकते. काँग्रेस चे सुभाष शेठ शेंडगे यांच्या सुनबाई यात दावेदार असू शकते तर चांगदेव भागाजी पाटील खेमनर यांच्या सौभाग्यवती यांना देखील येथून संधी दिली जाऊ शकते. तर महायुती कडून मात्र अद्याप गणातील सूत्रे जुळत नसल्याचे चित्र आहे. तरीपण महायुती कडून साकूर गणात जांबुत येथील सुरेश भागवत यांची सौभाग्यवती, सुभाष भुजबळ यांच्या सौभाग्यवती किंवा राष्ट्रवादी काँग्रेस च्या अमृता कोळपकर तर अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांच्या ‘सौं’ या संभाव्य उमेदवार असू शकतात. तसें मांडवे बुद्रुक गाव हे पिंपळगाव देपा गणात येत असले तरी येथील गावातील कार्यकर्त्यांचा साकूर गणाशी संपर्क आहे. त्यामुळे येथून देखील कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते. असा अंदाज आहे. तसें महायुती व काँग्रेस येथून योग्य उमेदवाराच्या शोधात आहेत.

पिंपळगाव देपा गणातून इच्छुक
या गणातून काँग्रेस कडून रणखांब गावाचे सरपंच बाबाजी गुळवे, शिंदोडीचे लक्ष्मण कुदनर, वरवंडी गावचे राजू वर्पे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. परंतु वेळप्रसंगी अनेक घडामोडी येथून घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी रणखांब गावचे रहिवासी, स्वच्छ प्रतिमेचे, आदर्श सरपंच म्हणून गणले जाणारे बाबाजी गुळवे हे काँग्रेस कडून प्रबळ दावेदार समजले जात आहेत. तर महायुती कडून येथे किरण भागवत, रणजित ढेरंगे, सोमनाथ बारवे, रवी दातीर, ऍड. अमित धुळगंड, भागवतराजे कुदनर, कांतीलाल गिते अशी मोठी यादी महायुतीची येथून आहेत. पण मताचे गणित जुळवल्यास रणजित ढेरंगे किंवा किरण भागवत यांना महायुती तिकीट देऊ शकतात.
भाजप नेते बुवाजी पाटील खेमनर यांच्या निधनाने पोकळी
बाळासाहेब कोंडाजी खेमनर यांचा या गटात मोठा दबदबा राहिलेला आहे. स्व. बुवाजी खेमनर व बाळासाहेब खेमनर यांचा साकूर गटात मोठा जनसंपर्क आहे. आजही स्व. बुवाजी पाटलांच्या निधनाने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसलेले नाही. अशातच बाळासाहेब खेमनर यांनी जिल्हा परिषदेच्या या जागेवर दावा केल्याने ही लढत आरपार ची होणार असे चिन्ह दिसत आहेत.
गुलाब भोसले यांचा झंजावात
भाजप चे तालुका अध्यक्ष गुलाब भोसले यांनी देखील काही वर्षांपासून साकूर गटात आपले प्रस्थ निर्माण केले आहे. सध्या ते महायुती चे प्रबळ दावेदार समजले जात आहे. गटातील सर्वच गावांमधून त्यांनी युवकांची फळी तयार केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी गुलाब भोसले यांनी उबाठा शिवसेनेतून भाजप मध्ये प्रवेश केला. माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या उपस्थित त्यांनी साकूर येथे भाजप प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांनी स्वतःला जिल्हा परिषद निवडणूक लढायची असा मनात निश्चय करून संपूर्ण गटात जनसंपर्क वाढवला. आज त्यांचे नाव जिल्हा परिषद गटात महायुती कडून अग्रभागी आहे. त्यामुळे बाळासाहेब कोंडाजी खेमनर व गुलाब भोसले यांच्यात कुणाला उमेदवारी मिळेल हे वेळेलाच कळेल.
बाळासाहेब सागर काँग्रेस चे मुख्य स्पर्धक
काँग्रेस कडून बाळासाहेब सागर यांना उमेदवारी निश्चित समजली जात असून त्यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून आपला प्रचार सुरु केला आहे. मोठा नातेसंबंध असल्याने याचा फायदा त्यांना मिळेल असे गणित आखले जात आहे. मोठा मित्र परिवार तसेच त्यांचे बंधू बाबाजी सागर यांचा असलेला जनसंपर्क बाळासाहेब सागर यांच्या पथ्यावर पडणार आहे.
शंकरराव पाटील खेमनर यांचा अनुभव कामा पडणार
साकूर गावाचे आदर्श सरपंच म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे, असे संगमनेर तालुका बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर यांनी स्वतः बाळासाहेब सागर या तरुणाचे नाव श्रेष्ठीकडे सुचवले, व हेच नाव आता उमेदवारी साठी पुढे आले आहे. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत शंकरराव पाटील खेमनर यांनी पराभव बघितला नाही, त्यामुळे यांच्या राजकीय अनुभवाची व रणनीती ची चर्चा मोठ्या चर्चेचा विषय राहिलेला आहे. येणाऱ्या काळात ते बाळासाहेब सागर यांना निवडून आणण्यास कुठलीही कमतरता ठेवणार नाही हे मात्र नक्की.
बाळासाहेब सागर व गुलाब भोसले अशीच ही निवडणूक होईल असे वाटत असले तरी महायुती कडून मात्र बाळासाहेब कोंडाजी खेमनर यांनी इच्छा व्यक्त केल्याने या वेळी ऐनवेळी कुणाला उमेदवारी मिळते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. तर काँग्रेस कडून मात्र बाळासाहेब सागर यांना उमेदवारी निश्चित समजली जात आहेत. तर येणारा काळच कशी लढाई होईल ते ठरवेल. तूर्त थांबूयात







