संपादकीय : सहदेव जाधव
निवडणूक अखेर काल राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम जाहीर झाला. दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान व 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. अनेकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. राज्य निवडणूक आयोगाने काल निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. 10 नोव्हेंबर 2025 रोजी अर्ज भरण्यास सुरुवात तर 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत उमेदवार उमेदवारी अर्ज भरू शकता. 18 नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची तारीख 21 नोव्हेंबर असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आणि इकडे इच्छुकांनी दंड थोपटली आहेत.
संगमनेर नगरपालिका निवडणुकीत आजी माजी आमदार यांच्या गटातच संघर्ष होईल असे चित्र दिसत आहे. महायुती कडून सुकाणू समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष स्वतः आ. अमोल खताळ आहेत. तर महाविकास आघाडी मात्र अजून वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहे. त्यांची निवडणुक रणनीती अद्याप समोर आली नाही मात्र आमदार सत्यजित तांबे यांच्या सौभाग्यवती मैथिली तांबे या रणांगणात उतरतील अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांत सुरु आहे. तर महायुती कडे देखील इच्छुकांची गर्दी वाढली आहे. अनेक इच्छुकानी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

महाविकास आघाडी की फक्त तांबे थोरात स्वबळावर लढणार
संगमनेर नगरपालिकेत अनेक वर्षांपासून तांबे थोरात यांची एकहाती सत्ता आहे. दुर्गा ताई तांबे या नगराध्यक्ष राहिल्या आहेत. परंतु पदवीधर आमदार सत्यजित तांबे हे काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत त्यामुळे येणारा काळ मोठ्या राजकीय घडामोडी चे संकेत देत आहे. सध्याची नगरपालिका निवडणूक ही तांबे थोरात पक्षाच्या चिन्हावर लढणार की आघाडी करून वेगळे चिन्ह घेऊन लढणार याची देखील चर्चा शहरात सुरु आहे. सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परंतु यावर सत्यजित तांबे हे मौन बाळगून आहेत. पण येणाऱ्या निवडणुकीत ते काही तरी ठोस भूमिका घेतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. कदाचित तांबे थोरात व उबाठा पक्षाचे समविचाऱ्यांना सोबत घेऊन एखांदी शहर आघाडी निर्माण करून त्याच बॅनर खाली तांबे थोरात पॅनल उभा करू शकतात. असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे.
महायुती ने मात्र वज्रमुठ आवळली
या निवडणुकीत महायुती ने मात्र एकजूट दाखवत शंखनाद केला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचे संगमनेर शहरात वाढलेले दौरे हे निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे संकेत देत आहेत. इच्छुक असलेल्या उमेदवारांना कामाला लागा अशा स्पष्ट सुचना वरिष्ठा नी दिल्या आहेत. या निवडणुकीत महायुती ने सुकाणू समितीची स्थापना केली असून युती मधील सर्व पक्षांना सन्मानपूर्वक स्थान दिले आहे. आ. अमोल खताळ यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. त्यामुळे महायुती पूर्ण ताकदीने या निवडणूक रिंगणात उतरल्याचे चित्र दिसत आहे.
नगरपालिका नगराध्यक्षा पदासाठी संभाव्य उमेदवार
महायुती कडून भाजपच्या पायल ताजणे, रेखाताई गलांडे, यांची नावे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. कदाचित आमदार अमोल खताळ हे आपल्या जवळील कार्यकर्त्यास देखील संधी देऊ शकतात. तसेच तांबे थोरात यांच्याकडून आमदार सत्यजित तांबे यांच्या सौभाग्यवती मैथिलीताई तांबे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. घराणेशाही वर होत असलेल्या सततच्या टिकेमुळे कदाचित जवळील कार्यकर्त्यास देखील संधी तांबे थोरात यांच्याकडून दिली जाऊ शकते. उबाठा तील काही पदाधिकाऱ्यांनी देखील इच्छा व्यक्त केली आहे. यात विशेष करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य उमेदवार वर्षाताई सं मंडलिक, अश्विनी वैभव अभंग, शोभा संजय फड, संगीता गायकवाड पाटील ही नावे चर्चेत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्र लढतील याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे निवडणूक अर्ज कोण भरेल याकडे आपले लक्ष्य असणार आहे.


अपक्ष उमेदवार ठरणार डोकेदुखी
नगरपालिका निवडणुकीत अपक्षांचा डंका वाजेल अशी शंका आहे. सध्या तरी कार्यकर्ते पक्ष श्रेष्ठीच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. तिकीट जाहीर झाल्यावर अनेकांची नाराजी श्रेष्ठीना डोकेदुखी ठरणार आहे. सुषमा ताई तवरेज या देखील नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत अशी माहिती मिळाली आहे. सध्या संजय क्षत्रिय यांच्या देखील शहरात मोठ्या प्रमाणात गाठी भेटी वाढल्या आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घडामोडी घडणार आहेत.







