संपादकीय : सहदेव जाधव
वाचकहो, आपण सध्या संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांच्या निवडणुकीचे गटनिहाय विश्लेषण करत आहोत. आपण तळेगाव दिघे गट तदनंतर जोर्वे जिल्हा परिषद गटाचे विश्लेषण केले आहे. सध्या लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. संगमनेर तालुक्यात सध्या महाविकास आघाडी व महायुती यांचा विचार करता दोन्हीमध्ये सरळ लढत होईल असे चित्र सध्या दिसत आहे. इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. आज आपण आश्वी जिल्हा परिषद गटाचे विश्लेषण करणार आहोत.
आश्वी जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिला साठी आरक्षित आहे. त्यामुळे येथे अनेक महिला उमेदवार इच्छुक आहेत. तर या गटाचे दोन गण आहेत आश्वी बुद्रुक गण व आश्वी खुर्द गण हे दोन ही गण सर्वसाधारण महिला साठी आरक्षित झाले आहेत अर्थात या संपूर्ण गटात आता “महिलाराज” असणार आहे. या गटात अतिशय अटी तटीच्या लढती या अगोदर झाल्या आहेत. आश्वी गटातील गावे हे संगमनेर तालुक्यात असून विधानसभा मतदारसंघ मात्र शिर्डी आहे. त्यामुळे येथे विखे परिवाराला मानणारा मोठा कार्यकर्ता आहे. तसेच माजी मंत्री माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता ही येथे मोठ्या प्रमाणात असल्याने येथील निवडणूक ही अटी तटीची होते. दोन्हीही नेत्यांची येथे कसब पणाला लागणार आहे. दोन्हीही नेत्यांचे तुल्यबळ कार्यकर्ते येथे आहे.

जिल्हा परिषदेसाठी गट व गणासाठी संभाव्य उमेदवार
जिल्हा परिषदेसाठी येथून अनेक जण इच्छुक आहेत त्यापैकी महायुती कडून विखे पाटील ठरवतील तोच उमेदवार असेल. यामध्ये प्राधान्याने माजी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी ताई निघुते, कैलास नाना तांबे यांच्या घरातील महिला सदस्य, पिंप्री लौकी आझमपूर ग्रामपंचायत च्या सरपंच संगिता भारतराव गिते, ऍड. पोपटराव वाणी यांच्या पत्नी ऍड. सुनंदा पोपटराव वाणी, लताताई अशोक जऱ्हाड, सारिका विशाल जऱ्हाड हे महायुती मधील संभाव्य उमेदवार असू शकतात. तर काँग्रेस कडून बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक विजय हिंगे, प्रमोद भोंद्रे, राजेंद्र चकोर, डॉ संजय सांगळे यांच्या कुटुंबातील सदस्य महिला उमेदवार असू शकतात.
काँग्रेस कडून विजय हिंगे यांच्या परिवारातील महिलेला संधी..?
बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक विजय हिंगे यांच्या कुटूंबातील महिला प्रबळ दावेदार असू शकते. विजय हिंगे हे जन माणसातील नेतृत्व आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक असल्याने त्यांनी या भागातील अनेक समस्या सोडवल्या आहेत. या गटातील बाळासाहेब थोरात यांची सर्व जबाबदारी विजय हिंगे यांच्याकडे होती. मागील वर्षी विजय हिंगे यांच्या शेतातील घरी बांधकाम कामगारांच्या सेफ्टी किट सापडल्याने त्यांचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. या प्रकरणात विजय हिंगे यांच्यावर कामगार आयुक्त यांनी धाड मारून गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली होती. या प्रकारणांनंतर राजकीय षडयंत्र झाले म्हणत मोठा जन समुदाय विजय हिंगे यांच्यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चाने आला होता. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील महिलेला संधी बाळासाहेब थोरात देतील अशी शक्यता आहे.
आश्वी गटात मंत्री विखे पाटील विरुद्ध माजी मंत्री थोरात असा रंगणार सामना
या गटात विखे पाटलांचे विशेष वर्चस्व आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत येथून ऍड. रोहिणीताई निघुते या विजयी झाल्या होत्या. येथे थोरात यांचे ही चांगले प्रस्थ आहे. पण विखे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर या लोकांची श्रद्धा आज ही आहे. हा परिसर सुजलाम सुफलाम करण्यासाठी स्व. पद्मविभुषण बाळासाहेब विखे पाटील यांचे योगदान असल्याने येथील जनता आज ही विखे पाटलांचा शब्द प्रमाण मानत आहे. येणारी निवडणूक ही विखे आणि थोरात यांच्यातील लढाई समजली जात आहे. त्यामुळे येणारा काळ हा आश्वी गटावर कुणाला “राजसत्ता ” देणार हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.







