संपादकीय :सहदेव जाधव
बुवाजी पाटील खेमनर यांचे 17 ऑक्टोबर रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते अवघे 49 वर्षाचे होते. आयुष्यभर संघर्ष करणारा हा संघर्षशाली नेता एवढ्या लवकर एक्सिट घेईल असे कुणालाही वाटले नाही. अखेर कायम अन्यायाविरोधात लढणारा हा नेता मात्र नियतीने लिहिलेल्या पानाला फाडू शकला नाही हे आमचं दुर्दैव. म्हणतात ना ‘जो आवडतो सर्वाना, तोच आवडतो देवाला’. शेवटी बुवाजी पाटलांचा आणि आमचा प्रवास एवढाच होता. येथे येऊनच थांबनार होता. बुवाजी ने आपल्या आयुष्यात मोठा कार्यकर्ता संच, भक्कम मित्र परीवार बनवला होता. ज्याच्याशी मैत्री केली त्याच्या हृदयात जागा केली. म्हणून प्रत्येक मित्राच्या घरातील सदस्य बुवाजी कधी बनला कळालेच नाही. शेवटच्या क्षणी देखील त्यांनी आपले मित्र परिवारावर विश्वास ठेऊन आपल्या सोबत देखील काही मित्राना ठेवले. आज बुवाजी आपल्यात नाही, पण त्यांची आठवण कधीही जाणार नाही ती आमच्या हृदयात कायम तेवत राहील.. म्हणूनच आजचा बुवाजी पाटलांसाठी मांडलेला “लेख प्रपंच”. आपण बघुयात बुवाजी पाटलांच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील महत्वाचे कार्य

बुवाजी पाटील सामाजिक क्षेत्रात अग्रभागी
बुवाजी पाटील अनेक सामाजिक कार्यक्रमात अग्रभागी राहत असत. जन्मलेल्या बाळाच्या बारश्या पासून ते वाढदिवस, विवाह सोहळे, आणि अंत्यविधी दशक्रिया यां सर्वच ठिकाणी ते आपली उपस्थिती लावत असे. यातून त्यांचा पठार भागात मोठा कार्यकर्ता संच निर्माण झाला होता. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना देखील रोज स्वतः स समाजकार्यात वाहून घेतले होते. अनेकांचे आपापसातील वाद कौटुंबिक वाद त्यांनी मिटवल्याचे उदाहरण आहेत. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी अन्याया विरोधात लढा दिला. समाजसेवा हेच ब्रीद वाक्य अग्रस्थानी ठेऊन लोकांची कामे केली. कधी ही कुणाकडून फुलाची आणि फळाची अपेक्षा कधी ठेवली नाही. सामाजिक क्षेत्रात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारें, हिवरे बाजार चे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांना ते आदर्श मानत.

बुवाजी पाटलांची विखे पाटील परिवाराबाबत विशेष आत्मीयता
बुवाजी पाटील हे आपल्या सामाजिक व राजकीय जीवनात स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा विशेष दाखला देत. विखे पाटील परिवाराच्या कामाची पद्धत ते सर्वसामान्य जनतेला सांगायचे. राज्याचे मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा आदेश स्वतः पाळत व आपल्या पठारातील कार्यकर्त्याला देखील पाळायला सांगत. विखे पाटलांनी घेतलेला निर्णय हा सदा सर आंखो पे असे मानत. पठार भागातून अनेकांनी पक्ष बदलले परंतु जेष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमनर आणि बुवाजी खेमनर यांनी मात्र कायम पठार भागातून विखे पाटलांची खिंड लावून धरली. जुने जाणते व ग्रामीण भागातील लोक आज ही म्हणतात ‘बाळासाहेब आणि बुवाजी’ यांच्यामुळे पठार भागात आज पर्यंत विरोध जिवंत राहिला. आज सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सगळेच जमा होतील, पण जो काळ कसोटी चा होता त्यावेळेस या जोडीने पक्ष डळमळून दिला नाही. पक्ष संघटन केले. हेच ओळखून पठार भागातील कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर विखे पाटील बाळासाहेब आणि बुवाजी ला विचारल्यानंतरच निर्णय घेत असत. पठार भागात बाळासाहेब आणि बुवाजी सांगेल तोच निर्णय विखे पाटील घेत असे. या दोघांनी कधीही विखे पाटलांकडे स्वतः साठी काहीही मागितले नाही. जे मागितले ते पठार भागाच्या हितासाठी व विकासासाठी मागितले. म्हणून यां जोडीकडे बघण्याचा दृष्टीकोन विरोधकांचा देखील आदरपूर्वक होता. कधीही आपल्या कार्याची पाठ स्वतः हुन थापडून घेतली नाही किंवा त्याची जाहिरातबाजी देखील केली नाही.

बुवाजी पाटलांचा राजकीय प्रवास
साकूर परिसरातील आदर्श व्यक्तिमत्व… पठार भागाची बुलंद तोफ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जायचा असे बुवाजी पाटील खेमनर! जांभूळवाडी ग्रुप ग्रामपंचायत चे ग्रामपंचायत सदस्य ते भाजप चे जेष्ठ नेते असा त्यांचा प्रवास राहिला. मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती ची निवडणूक झाली. या निवडणुकीत पंचायत समिती च्या निवडणुकीत त्यांना पिंपळगाव देपा गणातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु अटीतटी च्या या निवडणुकीत त्यांना थोडक्या मतांनी पराभव पत्कारावा लागला. प्रभावी वक्तृत्व गुण त्यांच्यात होता. भाषण करायला उभे राहिले तर विरोधकांवर तुटून पडायचे. पठार भागात अनेक वक्ते होतील पण बुवाजी सारखा स्पष्ट वक्ता पुन्हा होणे नाही. मागील विधानसभा निवडणुकीत आमदार अमोल खताळ यांचा प्रचारार्थ सभेत भाषण करताना त्यांनी घराणेशाही वर केलेले भाषण मोठं चर्चेत आले होते. त्यांच्यातील हेच कौशल्य जनतेच्या हृदयात एक विशिष्ट स्थान निर्माण करून गेले. राज्याचे जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ना. शालिनीताई विखे पाटील, मा. खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या बद्दल त्यांच्या मनात प्रचंड आत्मीयता होती.

मृत्यू च्या काही दिवस आधी आम्हा मित्र परिवाराला केलेल्या सुचना निष्ठा दाखवून गेली
चार ब्लॉक व वाल्व अशी अवघड शस्त्रक्रिया करायची होती. नामवंत डॉक्टरांना भेटून सल्ले घेतले होते. त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे माजी कृषी विभागाचे संचालक सुभाष बाजीराव पाटील खेमनर, डॉ. अशोक इथापे, शिंदोडी चे भागवतराजे कुदनर, भगवान उद्योग समूहाचे माऊली खेमनर, भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रौफ भाई शेख, सहदेव जाधव असे आम्ही रोज डॉक्टरांचे सल्ले घेत होतो. यावेळी ऑपरेशन च्या दोन दिवस अगोदर मला व रौफ भाई शेख यांना जिल्हा परिषद गटाच्या व पंचायत समिती गणांच्या निवडणुकी बाबत मोलाचा संदेश देऊन गेले. बाळासाहेब यांना शेवटची संधी देऊयात. मी तर या निवडणुकीत माझे ऑपरेशन होईल त्यामुळे मी अलिप्त राहणार आहे. पण तुम्ही साहेबाना म्हंटले पाहिजे साहेब यावेळेस संधी आहे. बाळासाहेबांनी आयुष्यभर संघटन वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. शेवटची संधी त्यांना द्या. एकदा गुलाल बाळासाहेबांवर पडू द्या असे तुम्ही साहेबाना सांगा. असा संदेश माझ्याजवळ आणि रउफ जवळ बुवाजीनी सांगितला. बुवाजी पाटील म्हणाले या निवडणुकीत मी अलिप्त राहिल आणि खरोखर असे ते कायमचे अलिप्त होतील अशी पुसटशी कल्पना देखील आमच्या मनात आली नाही. पण जाताना देखील बुवाजी पाटलांची पठार भागावरील प्रेम दाखवून गेली. उमेदवार कोण योग्य राहील हे सांगून गेली.

आ अमोल खताळ व मंत्री विखे पाटील यांचे प्रयत्न
बुवाजी पाटलांना आम्ही (सहदेव आणि रउफ) त्यांचा चिरंजीव संकेत याच्यासह मुंबई ला लीलावती येथे गेलो परंतु तत्पूर्वी बुवाजी पाटलांनी साहेबाना (ना. राधाकृष्ण विखे पाटील) भेटण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणून आम्ही अगोदर साहेबाना भेटलो. साहेबानी स्पष्ट शब्दात सांगितले पैश्याची काळजी करू नका. ऍडमिट व्हा. बाकीचे मी पाहतो तसेच त्यांचे OSD गौरी शंकर यांना विशेष लक्ष देण्यास सांगितले. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री कार्यालयात बसून सर्व फाईल बनवून घेतल्या. बुवाजीला आधार देत होते. काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे. असे वारंवार सांगत होते. परंतु लीलावती हॉस्पिटल ला गेल्यानंतर लीलावती हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांनी उशिराने ऑपरेशन ची तारीख दिल्याने आम्हाला माघारी यावं लागलं. दुसऱ्या दिवशी घरी आराम केला व पुन्हा आपल्या मुलाला घेऊन एकटेच पुणे येथील जहांगीर हॉस्पिटल ला ऍडमिट झाले. माहिती मिळाल्या नंतर सुभाष पाटील तातडीने हॉस्पिटल ला गेले. ऍडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी अवघड अशी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया च्या बारा ते अठरा तासानंतर बुवाजी पाटलांना पहाटे पाच वाजता स्ट्रोक बसला आणि ते तेव्हाच आपल्यातून निघून गेले. डॉक्टरांच्या अथक प्रयतनांना यश आले नाही आणि बुवाजी पाटलांचा जीवनाचा संघर्ष अध्याय समाप्त झाला.

साकूर गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली तालुक्यातून लोक साकुरकडे निघाली. बुवाजी चे अंतीम दर्शन घेण्यासाठी… सतत अन्यायाविरोधात दंड थोपटणारा एक “न्यायसूर्य” कायमचा अस्ताला गेला होता. जेष्ठ नेते वसंतराव देशमुख, वसंतराव गुंजाळ, ऍड. बापूसाहेब गुळवे, सुदामराव सानप, डॉ. अशोक इथापे, दिलीपराव शिंदे, शालिग्राम होडगर, ऍड. दिपकराव थोरात, शरद नाना थोरात, अविनाश थोरात यांच्या सोबत गेले अनेक वर्षांपासून तालुक्यातील परिवर्तनासाठी संघर्ष करणारा हा युवा चेहरा होता. तालुक्यातील परिवर्तन झाल्यानंतर बुवाजी खेमनर यांनी साकूर गावात फेरी काढत एकच जल्लोष केला होता. हा जल्लोष साजरा करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता.

17:10:2025 रोजी रात्री उशिराने त्यांच्यावर मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले. बुवाजी पाटील खेमनर हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांचे विखे परिवाराशी घनिष्ठ संबंध होते. राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे नाव होते. अन्याया विरुद्ध बंड करत म्हणून त्याची पठार भागासह संपूर्ण तालुक्यात मोठी ओळख होती सामाजिक राजकीय व धार्मिक क्षेत्रात त्यांनी आपले नाव बनवलं होतं. आज त्यांच्या जाण्याने साकूर परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
कठिण नारळाचें अंग । बाहेरी भीतरी तें चांग ॥1॥
तैसा करी कां विचार । शुद्ध कारण अंतर ॥ध्रु.॥
वरि कांटे फणसफळा । माजि अंतरीं जिव्हाळा ॥2॥
ऊंस बाहेरी कठिण काळा । माजी रसाचा जिव्हाळा ॥3॥
मिठें रुचविलें अन्न । नये सतंत कारण ॥4॥
या तुकाराम महाराजांच्या अभंगा प्रमाणे बुवाजी पाटील वरवरून टणक नारळासारखे होते परंतु आत मधून गोड पाण्याच्या झऱ्या सारखे होते. जसे फणस वरून काटे पण आतून गोड गरे तसेच बुवाजी पाटील यांचा स्वभाव. ऊस जसा वरून टणक तसा बुवाजी वरून टणक पण आतून उसाच्या रसासारखा मधुर गोड होता. म्हणून वरील तुकाराम महाराजांचा हा अभंग हा बुवाजी पाटलांसाठी लागू होतो. आमच्या या नेतृत्वाला भगवंताने त्याच्या हृदयात स्थान द्यावे हीच पठार भागाच्या वतीने भगवंत चरणी प्रार्थना..

स्व. बुवाजी पाटील खेमनर यांचा खूप मोठा परिवार आहे. आज त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, चार बहिणी, तीन पुतणे, नऊ पुतण्या, भाचे भाची असा मोठा परिवार आहे. साकूर पठार भागातील एक आदर्श व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख तसेच एक हुशार, मुत्सद्दी राजकारणी, प्रखर भाषणशैली, स्पष्ट वक्ता म्हणून त्यांना साकूरकर ओळखत. त्यांच्या या अचानक जाण्याने संगमनेर तालुक्यासह पठार भागाची मोठी हानी झाली आहे. पठार भागात बुवाजी पाटलांची कमी भासणार आहे. असो अशा या तेजस्वी सूर्याला अखेरचा दंडवत.
शब्दरचना : सहदेव जाधव (B. A D. L. L. &L.W)







