संगमनेर प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागा तर्फे “माझी वसुंधरा अभियान ४.०” अंतर्गत संगमनेर नगरपरिषदेला १ कोटी ५० लाख ५ हजार ४७७ रुपये इतका भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरात पर्यावरण संवर्धन, पर्जन्यजल संचयन, सौर ऊर्जा वापर आणि जनजागृतीसाठी महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

या निधीअंतर्गत वृक्षारोपण व गार्डन विकास (समूहित) – रुपये ७४ लाख ४५ हजार ८०३ (विविध उद्याने , खुल्या जागा , रस्ता कडेची लागवड आणि घनदाट वनराई प्रकल्प यांचा समावेश) असा मंजूर करण्यात आला आहे. पर्जन्यजल संचयनासाठी परकुलेशन पिट्स २२ लाख ५१ हजार ६४१ रुपये, कवी अनंत फंदी नाट्यगृह येथे ऑन-ग्रिड सौर ऊर्जा प्रणाली ४२ लाख ०४ हजार ०३३ रुपये मंजूर करण्यात आली आहे. पर्यावरण विषयक माहिती शिक्षण जनजागृती मोहिम यासाठी ७ लाख ५० हजार रुपये असा एकूण १कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे
या निर्णयाबद्दल आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.

महायुती सरकारकडून संगमनेरच्या पर्यावरणसंवर्धनासाठी मिळालेला १कोटी ५० कोटींचा निधी हा संगमनेरकरांसाठी मोठा दिलासा आहे.वृक्षारोपण, पर्जन्य जल संचयन आणि सौर ऊर्जा यांसारख्या उपक्रमांमुळे शहरात हरित व शाश्वत विकासाला चालना मिळेल. नगरपरिषदे च्या माध्यमातून सर्व कामे गतिमान पद्धतीने पूर्ण केली जातील,”
——–अमोल खताळ पाटील आमदार संगमनेर विधानसभा







