राहुरी (प्रतिनिधी) :राहुरी तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील दवणगाव परिसरात ही घडली आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी बजरंग कारभारी साळुंखे (रा. दवणगाव) याने पोलीस कोठडीत दिलेल्या धक्कादायक कबुलीमुळे एक गंभीर खून प्रकरण उघड झाले आहे.
आरोपी बजरंग साळुंखे याने स्वतःच्या मेहुण्याचा गळा दाबून खून केला व त्याचा मृतदेह घराच्या पाठीमागील शेतात पुरल्याचे पोलीस तपासात कबूल केले आहे.
सविस्तर घटनेचा तपशील असा की, दवणगाव येथील बजरंग साळुंखे याच्यावर अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आठ दिवसांपूर्वी पीडित मुलींनी स्नेहालय संस्थेच्या मदतीने राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणात बजरंग साळुंखे याच्यासह त्याचा मुलगा पृथ्वीराज बजरंग साळुंखे, पत्नी शीतल बजरंग साळुंखे तसेच शीतलचा भाऊ निलेश गाडेकर अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी बजरंग व त्याची पत्नी शीतल साळुंखे यांना अटक केली.
पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपी बजरंग साळुंखेने धक्कादायक खुलासा केला. सहा महिन्यांपूर्वी एप्रिल महिन्यात त्याने स्वतःचा मेहुणा निलेश गाडेकरचा गळा दाबून खून केला होता. यामागचे कारण सांगताना त्याने कबूल केले की, निलेश हा नेहमी दारू पिऊन वाद घालत असे, ज्यामुळे त्रस्त होऊन त्याने हा खून केला. त्यानंतर घराच्या पाठीमागे शेतात खड्डा खोदून मृतदेह पुरून ठेवला होता.
या कबुलीनंतर राहुरी पोलिसांनी मंगळवारी (दि. २३ सप्टेंबर) सकाळी आरोपीला घेऊन घटनास्थळी धाव घेतली. आरोपीने ठिकाण दाखवून दिल्यानंतर देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने शेतात उकरकाम सुरू करण्यात आले. यावेळी पुरलेला मृतदेह शोधून काढण्यात पोलीस यशस्वी झाले.
या कारवाईदरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, नायब तहसीलदार संध्या दळवी, आरोग्य अधिकारी श्रीमती खान, ठसे तज्ज्ञ, तसेच पोलीस कर्मचारी नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सतिश कुर्हाडे, शिंदे, आजिनाथ पाखरे, सुरज गायकवाड, राहुल यादव, गणेश लिपनी, गोवर्धन कदम, आदिनाथ चेमटे, महिला पोलीस कर्मचारी वंदना पवार, यांच्यासह मोठा कर्मचारी वर्ग घटनास्थळी उपस्थित होता.
दवणगावचे सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या घटनेचे साक्षीदार ठरले.एका गुन्ह्याच्या चौकशीत खुनाचा गुन्हा उघड झाल्याने दवणगाव परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणामुळे आधीच तणावाखाली असलेला हा भाग आता खुनाच्या प्रकरणाने आणखी हादरला असून, नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.






