संगमनेरातील बेकायदेशीर कत्तलखाने उध्वस्त होणार आमदार अमोल खताळांकडून प्रशासनाला कडक सूचना
संगमनेर | प्रतिनिधी: संगमनेर शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर आता निर्णायक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा ठाम इशारा देत आमदार अमोल खताळ यांनी शहर पोलीस प्रशासन व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना तात्काळ कारवाईचे कडक आदेश दिले आहेत.
येत्या चार ते पाच दिवसांत शहरातील सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उध्वस्त करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.सध्या शहरातील विविध भागांत सुमारे २८ बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या कत्तलखान्यांमुळे परिसरात अस्वच्छता पसरत असून दुर्गंधी, आरोग्याच्या तक्रारी तसेच पर्यावरणीय प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आमदार. खताळ यांनी प्रशासनाला कोणतीही दिरंगाई न करता ठोस आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

आ. खताळ म्हणाले, “शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने कायमस्वरूपी बंद व्हावेत, ही माझी सुरुवातीपासून ठाम भूमिका आहे. मी वारंवार अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला आहे. कारवाई झाल्यानंतर काही काळ शांतता दिसते, मात्र पुन्हा हे कत्तलखाने सुरू होत असल्याचे आढळते. त्यामुळे यावेळी तात्पुरती नव्हे, तर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते पुढे म्हणाले, मी आमदार झाल्यानंतर लगेचच बेकायदेशीर कत्तलखान्यां विरोधात कडक पावले उचलण्याचे आदेश दिले होते. त्या वेळी नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात कारवाई करून कत्तलखाने उध्वस्त केले होते. मात्र त्यानंतर पुन्हा काही ठिकाणी कत्तलखाने सुरू झाले. हे अजिबात सहन केले जाणार नाही.
कत्तलखान्यांच्या प्रश्नावर अधिवेशनात सातत्याने ठाम भूमिका घेणारा मी एकमेव आमदार आहे. शहरातील बेकायदेशीर प्रकारांना थारा दिला जाणार नाही. नागरिकांच्या आरोग्याशी, कायदा-सुव्यवस्थेशी आणि स्वच्छतेशी कुठलीही तडजोड केली जाणार नाही. चार ते पाच दिवसांतच बेकायदेशीर सर्व कत्तलखाने उध्वस्त झालेले पाहवयास मिळणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले आहे.

“यापूर्वीच्या बेकायदेशीर कत्तलखान्यांमध्ये सहभागी झालेल्या आरोपींवर एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच, बेकायदेशीर कत्तलखाने उध्वस्त करताना मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भात मी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. तसेच या बेकायदेशीर कत्तलखान्यांमुळे संगमनेर शहरावर लागलेला कलंक देखील पुसून काढण्याचा आमचा निर्धार आहे. स्थानिक नागरिकांना योग्य आणि सुरक्षित वातावरण मिळावे, हे आमचे प्रमुख ध्येय आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.”
— अमोल खताळ (आमदार) –






