सिन्नर वृत्तसंस्था: जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सुरू असलेला बनावट देशी दारूचा अड्डा राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला. परप्रांतीय नागरिकांकडून हा अड्डा चालविला जात असल्याचे निष्पन्न झाले असून, सोमवारी (ता.9)झालेल्या या कारवाईत चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत हजारो लिटर बनावट मद्यसाठ्यासह वाहन असा सुमारे २१ लाख ८१ हजार ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये वेणुगोपाल सिद्धय्या चेकिल्ला (वय ४६, रा. गणेशनगर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर; मूळ रा. तेलंगणा), नरेश लिंगागौड जेल्ला (२९, रा. नांदूरशिंगोटे, ता. सिन्नर; मूळ रा. मेदक, तेलंगणा), हरीश गंगागौड बबांतुला (३०), नरेंद्रभौड तिरुपतीगौड सुरमपल्ली (३२, दोघे सध्या रा. नांदूरशिंगोटे, ता. सिन्नर; मूळ रा. कामारेड्डी, तेलंगणा) यांचा समावेश आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक संतोष झगडे यांना नांदूरशिंगोटे परिसरात बनावट देशी दारूचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपअधीक्षक अ. सु. तांबारे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने सोमवारी छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईत ११२.६८ लिटर बनावट देशी दारू, १,९९१.५५ लिटर देशी दारू, तसेच क्रेटा चारचाकी कार (एमएच १७ डीजे ५५३८) असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई उपअधीक्षक तांबारे, निरीक्षक शैलेंद्र मराठे, दुय्यम निरीक्षक डी. बी. कोळपे, राहुल जाडकर, एस. एस. भगत, विष्णू सानप, सोनाली चंद्रमोरे, संतोष कडलग, दुर्गादास बाविस्कर, अमित गांगुर्डे, राकेश पगारे व हर्षल नांद्रे यांच्या पथकाने बजावली.
नाशिक अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेले सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे सारख्या छोट्याशा गावात परराज्यातून येऊन डुप्लिकेट दारु बनवण्याचा कारखाना उभा राहतो व याची कानोकान खबर लागत नाही ही एक आश्चर्यकारक घटना आहे. खरे तर हे आपल्या यंत्रनेचे तसेच प्रशासनाचे मोठे अपयश समजले पाहिजे. आज जरी ही कारवाई मोठी दिसत असली आणि कारवाई चे कौतुक होत असेल तरीही आरोपीनी परराज्यातून येऊन दुर्गम भागात आपला उद्योग थाटणे हे संशयास्पद आहे. अन्न व औषध प्रशासनाने याचा गांभीर्याने खुलासा करणे गरजेचे आहे. डुप्लिकेट दारूचा हा उद्योग थाटला तेव्हा स्थानिक प्रशासन काय करत होते? ही त्यांची जबाबदारी नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. परप्रांतीय हा उद्योग कुणाच्या आशीर्वादाने करत होते याचा तपास होणे गरजेचे आहे अशी या वृत्तांतून आम्ही मागणी करत आहोत.






