संपादकीय : सहदेव जाधव
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे पडघम आता वाजायला सुरुवात झाली आहे. काल राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री यांनी संगमनेर मध्ये येऊन कार्यकर्त्यांना चार्ज केले. व महायुतीचा भगवा फडकवा असे आवाहन काल मंत्री विखे पाटील यांनी आमदार अमोल खताळ यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमातून केले आहे. त्यामुळे आ अमोल खताळ यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमातून मंत्री विखे पाटील यांनी चांगलेच फटाके फोडले आहे.
अजून निवडणूक जाहीर होणार आहे. नुकतेच गटनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. आणि आपण मागे तळेगाव दिघे गटाची चर्चा केली होती. आता आपण जोर्वे जिल्हा परिषद गटाची माहिती घेऊया. जोर्वे जिल्हा परिषद गटात अंभोरे गण आणि जोर्वे गण आहेत. यात जोर्वे जिल्हा परिषद गट हा इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी साठी आरक्षित आहे तर पंचायत समिती अंभोरे गण हा सर्वसाधारण म्हणजे खुला आहे. तर जोर्वे गण हा सर्वसाधारण महिला असा असणार आहे. या गटात दोन्हीही पक्षाची कसरत पणाला लागणार आहे. या गटात दोन्हीही पक्षाची ताकद बरॊबरीत आहे. तसेच हा गट आजी माजी मंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळे या गटातील राजकीय घडामोडींकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, दिवाळीचा मुहूर्त साधून, इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारापर्यंत शुभेच्छा, भेटवस्तू पोहचवताना इच्छूक दिसत असल्याने रंगत वाढत आहे. संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील तसेच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा होमग्राऊंड आहे. बाळासाहेब थोरात यांचे मुळगाव जोर्वे आहे. व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदार संघातील असणारा हा जोर्वे जिल्हा परिषद गट आहे. या गटाकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी आरक्षण आहे. तर जोर्वे पंचायत समिती गण व अंभोरे पंचायत समिती गण या गटात आहेत. अंभोरे गणाकरिता सर्व साधारण आरक्षण निघाल्याने काँग्रेस व भाजपसह विविध पक्षाच्या इच्छुकांची चाचपणी सुरू झाली आहे. विखे-थोरात कार्यकर्त्यांची येथे सरळसरळ लढत होणार असे चिन्ह स्पष्ट आहे. दोन्हीही पक्षांकडून विविध नावांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आता या लढतीला विशेष महत्व असणार आहे त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे.

जोर्वे जिल्हा परिषद गट म्हणजे संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचा जि. प. गट असून या गटात अनेक गावे हे शिर्डी मतदारसंघातील आहेत. त्यामुळे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मंत्री विखे पाटील या दोन्हीही नेत्यांचा मोठा प्रभाव या गटावर राहिला आहे. हा गट शिर्डी विधानसभा मतदार संघात जोडल्या पासून तेथील लोक विखे परिवाराशी जोडले गेले. येथील लोकांची नाळ जुळलेली असल्याने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे कार्यकर्ते तयार झाले आहे, तर स्वतः चे गाव, विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून व जुन्या ऋणानुबंधाने बाळासाहेब थोरात यांचा परिसरावर प्रभाव असला तरीही आज ही जोर्वे ग्रामपंचायत विखे पाटील यांचे समर्थक असलेले गोकुळ दिघे यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांना आपले गाव आपल्या ताब्यात ठेवता आले नाही याची सल नक्कीच आहे. जोर्वे जिल्हा परिषद गट हा तसा दोन्हीही पक्षांना सोपा नाही. विखे – थोरातांच्या भोवती कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. रथी महारथी एकमेकांसमोर आहे. सहकाराच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी आपले वर्चस्व निर्माण करून कार्यकर्ते तयार केले आहेत.

या येणाऱ्या निवडणुकीत विखे गटाकडून जोर्वे चे गोकुळ दिघे, कोल्हेवाडी चे राहुल दिघे, राष्ट्रवादी चे सरुनाथ उंबरकर, तर थोरात गटाकडून संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, अंभोरेचे भास्कर खेमनर, डॉ.राजेंद्र कोल्हे, काल पर्यंत बाळासाहेब थोरातांचे कडवे विरोधक असलेले व विखे पाटलांचे कट्टर समर्थक अशी ओळख असणारे शरदनाना थोरात हे नुकतेचं थोरात यांच्याकडे गेले आहेत. त्यांना बाळासाहेब थोरात उमेदवारी देऊ शकतात अशी चर्चा आहे. त्यामुळे शरदनाना थोरात हे या गटातून उमेदवारीचे प्रमुख दावेदार समजले जात आहेत. तर विखे समर्थक असलेले गोकूळ दिघे हे नाव महायुती कडून अव्वल समजले जात आहे. मात्र इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे.
शरदनाना थोरात व गोकुळ दिघे परस्पर उभे राहण्याची शक्यता
माजी मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू तथा कधीकाळी बाळासाहेब थोरात यांना जाहीर आवाहन देणारे शरद नाना थोरात हे आज बाळासाहेब थोरात यांच्या सोबत गेले आहेत. शरदनाना थोरात एक आक्रमक वक्ता म्हणून संपूर्ण तालुक्याला प्रचलित आहेत. काही दिवसांपासून ते राजकारणापासून अलिप्त होते. अनेक दिवसांपासून ते नाराज असल्याचे बोलले जात होते. परंतु आता त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा हात हातात घेतला आहे. त्यामुळे कधीकाळी विखे परिवाराशी एकनिष्ठ असलेले व विखे परिवाराचा शब्द प्रमाण मानणारे शरदनाना थोरात हे अचानक बाळासाहेब थोरात यांच्या टापुत दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेच्या उमेदवारी साठी त्यांचे नाव काँग्रेस पक्षाकडून आघाडीवर आहे.
विखे परिवाराचे कट्टर समर्थक तथा जोर्वे गावचे गोकुळ दिघे
जोर्वे गावचा एक तरुण तडफदार नेता म्हणून गोकुळ दिघे यांची ओळख तरुणांच्या साहाय्याने निर्माण झाली आहे. गोकुळ दिघे या तरुणाने आपल्या स्वताच्या हिमतीवर कार्यकर्त्यांचा गावात मोठा संच उभा केला. गोकुळ अगदी थोडक्या कालावधीत गावातील ग्रामस्थांच्या गळ्यातील ताईत बनला. बाळासाहेब थोरात राज्याचे मंत्री असताना देखील त्यांच्या ताब्यातून ग्रामपंचायत या तरुणाने ताब्यात घेतली. विखे परिवाराशी निष्ठा ठेऊन अनेक निधी ग्रामपंचायत साठी आणले. गावाचा विकास केला. जोर्वे गावासह संपूर्ण गटात एक मोठी ओळख गोकुळ ने निर्माण केली. संगमनेर शहरातील जोर्वे नाक्यावर हिंदू मुस्लिम वाद निर्माण झाला होता. तेव्हा जोर्वे व परिसरातील हिंदू युवकांना हाकनाक मारहाण झाली होती. त्यावेळेस गोकुळ दिघे हे पात्र ज्यास्त चर्चेत आले होते. यावेळी गोकुळ या तरुणाची खंबीर भूमिका संपूर्ण तालुक्याने बघितली होती. जोर्वे नाका येथील अतिक्रमण व दहशतीचा बिमोड गोकुळ दिघे यांच्यामुळे झाला हे पण निश्चित.
त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत गोकुळ दिघे हे जोर्वे जिल्हा परिषद गटाचे प्रबळ दावेदार ठरतील असे चिन्ह स्पष्ट होत आहेत.
तसेच या गटावर महायुती चे राष्ट्रवादी काँग्रेस देखील या जागेसाठी दावा करू शकतो. या गटात पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते राहिलेले सरूनाथ उंबरकर हे सुध्दा याच गटातून येतात म्हणून ते देखील या गटातून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. महायुतीच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादी करिता सोडावी अशी मागणी राष्ट्रवादी करू शकते.
अंभोरे गणातील प्रबळ दावेदार
जिल्हा परिषद जोर्वे गटातील अंभोरे गण हा सर्वसाधारण व्यक्तीसाठी आरक्षित आहे. त्यामुळे येथे साहजिकच हवसे नवसे गवसे यांचा धुमाकूळ होणार आहे. मात्र पक्षीय नेते कुणावर विस्वास टाकतात हे महत्वाचे ठरणार आहे. विखे गटाकडून या गणात मालुंजे गावचे संदिपराव घुगे, रामभाऊ घुगे, डिग्रस गावचे अशोकराव खेमनर, प्रा. नानासाहेब तळेकर, ही नावे चर्चेत आहेत. थोरात गटाकडून भास्कर खेमनर, आण्णासाहेब जगनर, राहुल खेमनर, तुळशीराम मलगुंडे, संतोष नागरे आदीजण चर्चेत आहेत.
जोर्वे गणात अनेकांचा बोलबाला
जोर्वे गणातून विखे गटाकडून दिलीप इंगळे यांच्या परिवारातील महिला किंवा कोल्हेवाडी चे राहुल दिघे, शिवाजीराव कोल्हे, गणेश भूसाळ यांच्या परिवारातील महिला तसेच थोरात गटाकडून सुरेश थोरात, डॉ. राजेंद्र कोल्हे, ॲड रामदास शेजूळ यांच्या घरातील महिलांना संधी मिळू शकते. तसेच काल जयश्री ताई थोरात यांनी मनिषा स्वप्नील उंबरकर या महिलेच्या घरी अचानक भेट दिल्याने हे नाव देखील आता चर्चा सुरु झाली आहे.
सध्या तरी इच्छुकांची गर्दी वाढली असल्यामुळे नेत्यांचा ताप ही वाढला आहे. येणारा काळच कुणाला उमेदवारी मिळेल हे सांगेल. पण सध्यातरी या गटात लढत ही थोरात वि विखे पाटील अशीच होईल. यासाठी दोन्हीही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसलेली दिसून येत आहे.







