आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महाविकास आघाडीने इतर मनसेसह इतर पक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. पण, त्यावेळेस चर्चा अर्धवट राहिल्याने राहिल्याने आज बुधवारी देखील या शिष्टमंडळाने पुन्हा एकदा निवडणूक आयोगासोबत बैठक घेतली आहे.
आज च्या बैठकीला मात्र शरद पवार अनुपस्थित राहिले. आजच्या शिष्टमंडळामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, रईस शेख, अनिल परब, अनिल देसाई, अजित नवले ही मंडळी उपस्थित होते. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेसुद्धा यावेळी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासमोर अनेक मुद्दे मांडले आहेत ते असे
शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, चोक्कलिंगम म्हणतात काही जबाबदारी आमच्याकडे नाही तर, राज्य निवडणूक आयोग म्हणतं आमच्याकडेही नाही. मग आम्ही कोणाशी बोलू? असा सवाल त्यांनी यावेळी केला. त्रुटीसह जर निवडणुका घ्यायच्या असेल तर निवडणुका कशाला घेता? थेट ‘Election to Selection’ करून टाका, असा खोचक टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच, केंद्र सरकार व्हीव्हीपॅट देत नसतील तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, उद्धव ठाकरे म्हणाले की, 5 वर्षं निवडणूक घेतली नाही, अजून 6 महिने निवडणूक घेऊ नका. राजकीय पक्षांसाठी, सत्ताधाऱ्यांसाठी काम करता असे दिसत आहे असे राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सुनावले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, निवडणुका लढवतं राजकीय पक्ष, राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी दाखवत का नाही? असा सवाल केला. मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी? सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे. सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही, निवडणुकीसाठी जास्त दिवस लागले तरी चालेल, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी राज ठाकरें यांनी केली आहे. निवडणूक आयोगाला निवडणुक घेण्याशिवाय दुसरे काय काम आहे? असा सवालही त्यांनी विचारला. असे म्हणत राज ठाकरे यांनी देखील निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुद्दा मांडताना म्हटले की, आम्ही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्यावर काम झाले नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत. त्याबाबतही अनेक तक्रारी असल्याचे मत त्यांनी मांडले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगासमोर यादीच ठेवली. ते म्हणाले की, अंतेश्वर गंगाराम शिंदे हा उदगीरचे मतदार असून त्यांचा काही ठावठिकाणा नाही. EPIC क्रमांक वेगवेगळा असायला पाहिजे. बरेच मतदार असे की ज्यांना एकच EPIC क्रमांक असल्याचे ते यावेळी म्हणाले. आम्ही अर्ज केला, जाब विचारलं तर आयोग उत्तर देत नसल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली.
शेकापचे जयंत पाटील हे यावेळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले की, बोगस मतदान होत आहे त्यावर कोणाच काही अंकुश नाही. अशी उत्तरे आम्हाला अपेक्षित नाही ही उत्तरे आम्हाला नको आहेत. निवडणुक आयोगाचा बोलवता धनी कोण? असा सवाल त्यांनी या बैठकीत केला.








