संपादकीय :सहदेव जाधव
मराठा आरक्षण आणि विखे पॅटर्न
मराठ्यांना आरक्षण मिळतंय की फक्त ‘गाजर’! येणारा काळ काय ठरवणार?
श्रेय कुणाला द्यायचं मुख्यमंत्री फडणवीसांना की मंत्री विखे पाटलांना…? यावरच करूयात चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी एल्गार पुकारला. सर्व मराठ्यांना मुंबई सर करायची म्हणून आवाहन केले. मनोज जरांगे यांना शिंदे सरकारच्या काळात मुंबईत येण्यापासून मुंबईच्या वेशीवरच रोखले गेले. यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी झाले खरे, परंतु तेव्हा दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी तत्कालीन सरकारला जमले नाही. याच कारणास्तव मनोज जरांगे आणि मराठ्यांनी आता मुंबई कडे कूच केली होती.


अगदी शांत डोक्याने हा आंदोलनाचा सर्व घटनाक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बघत होते. मराठ्यांच्या प्रत्येक घडामोडी वर फडणवीस बारीक लक्ष्य ठेऊन होते. मनोज जरांगे रोज सकाळीच उठून मीडिया समोर येऊन देवेंद्रजी ना शिव्या देत होते. खरे तर जरांगे एकमेव या देशातील नागरिक होते की ते संविधानिक पदावरील व्यक्तीला जाहीर शिव्या देत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर देखील जरांगे बोलत होते, पण फडणवीस यांनी दाखवलेला संयम कुणीही विसरणार नाही.
मराठा समाजाचा आतून कुणीतरी राजकारण करत असल्याचे मुख्यमंत्री महोदयांना समजून चुकले होते. याचाच विचार करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षण उपसमितीची स्थापना केली. यातच फडणवीस यांची हुशारी दिसून आली. आणि विशेष म्हणजे या समितीच्या अध्यक्ष पदी त्यांनी शांत आणि तेवढेच संयमी हुशार मुत्सद्दी असलेले अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड केली. आणि खऱ्या अर्थाने तेथेच सरकार यशस्वी झाले.
पुढे मनोज जरांगे यांच्या सह हजारो मराठ्यांनी मुंबई त आझाद मैदानावर ठाण मांडले. मुंबई म्हणजे चाकरमाण्यांची नगरी असे समजतात. परंतु मराठ्यांनी याच चाकरमाण्याचे जणजीवन विस्कळीत केले. भारताची आर्थिक राजधानी समजली जाणारी मुंबई ज्यास्त दिवस या स्थितीत ठेवणे परवडणारे नाही. म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी थेट आपल्या मंत्रिमंडळातील दीर्घ अनुभवाची कसब पणाला लावली आणि थेट मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांना उपोषण सोडण्यास परावृत्त केले.

मराठा आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे, मंत्री विखे पाटील, व मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे नाव इतिहासात वर्षानुवर्षे घेतले जाईल हे नक्की. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यात विखे पॅटर्न चालवल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. जेव्हा जेव्हा या राज्यात पवार पॅटर्न चालवला जातो तेव्हा त्याला उत्तर हे विखे पॅटर्न च देऊ शकतो हा इतिहास आहे. त्यामुळे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे यांच्या आंदोलनामागे पवार साहेब असल्याचे बोलले जात होते. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य चाल खेळत आपल्या मंत्रिमंडळातील हुकमी एक्का बाहेर काढला ते म्हणजे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील..! विखे पाटील
विखे पाटील यांना फक्त या समितीचे अध्यक्षच केले नाही तर मराठा आरक्षणाचे सर्व अधिकार देऊन टाकले. आणि हे एक चॅलेंज म्हणून विखे पाटलांनी स्वीकारले आणि ते यशस्वी केले. मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष योगदान असल्याचे स्वतः आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मान्य केले. या सर्व घडामोडीत मंत्री विखे पाटील यांनी घेतलेली ठाम भूमिका महत्वाची ठरली आहे. संपूर्ण राज्यभरातून विखे पाटलांचे मोठे कौतुक होत आहे. तर जाणकार मंडळी आज ही म्हणत आहे हा विखे पाटील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवलेला ‘विखे पॅटर्न’ आहे.








