भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांचे मनोगत जसेच्या तसें त्यांच्या शब्दात..
साकूर पठार भागातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमनर यांचा आज वाढदिवस! सकाळीच त्यांना फोनवर शुभेच्छा दिल्या तेव्हा त्यांनी आपला जवळचा सहकारी स्व.बुवाजी खेमनर यांच्या निधनाने यावर्षी वाढदिवस साजरा करणार नसुन कुणीही पुष्पगुच्छ, शाल, हार इ.आणु नये असे सांगितले, यावेळी स्व.बुवाजी च्या आठवणीने ते अतिशय भावुक झाल्याचे जाणवले.

स्व.बुवाजी खेमनर यांचे निधन झाले तेव्हा त्यांचे पार्थिव पुण्याहुन आणताना बाळासाहेब दादा आणि मी सोबतच होतो. पठारभागाचा हा ढाण्या वाघ आपला भक्कम साथीदार गेल्याने अतिशय भावुक झाल्याचे मी पाहिले. गाडीत येताना फक्त आणि फक्त कै.बुवाजी च्याच आठवणी आम्ही एकमेकांना सांगत होतो. पठारभागातील बाळासाहेब-बुवाजी ही विरोधकांची जोडी इतिहासातील संताजी-धनाजी सारखीच गाजली. या जोडीतील स्व.बुवाजी खेमनर हे रत्न हरपले आहे, परंतु आजही बाळासाहेब कोंडाजी खेमनर उर्फ दादा हे भक्कमपणे उभे आहे. आज त्यांचा वाढदिवस! कै.लोकनेते पद्मविभुषण बाळासाहेब विखे पाटील आणि त्यानंतर विद्यमान जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणुन आपली ओळख निर्माण करणारे बाळासाहेब कोंडाजी खेमनर हे पहिल्यापासुनच कधीही वाढदिवस साजरा करण्यांची त्यांना हौस नाही, परंतु मागील काही वर्षात कार्यकर्ते त्यांचा छोटा-मोठा वाढदिवस करत आले.

मागील वर्षी नवनिर्वाचित लोकप्रिय जायंट किलर आमदार अमोल खताळ पाटील हे स्वत: आले होते. मी राजकारणात 2008 साली प्रवेश केला तेव्हापासुनच माझे वडील स्व.सिराजभाई यांच्या मार्गदर्शनाबरोबरच बाळासाहेब-बुवाजी या जोडीच्या मार्गदर्शनात काम करत आलो आहे. आज माझे वडील स्व.सिराजभाई व स्व.बुवाजी दोघेही नसले तरी बाळासाहेब दादां बरोबर माझी केमिस्ट्री आजही चांगली आहे.आम्ही सोबत अनेक निवडणुका लढवल्याच्या आठवणी आजही कायम आहेत. कशा कशा परिस्थितीत आम्ही खिंड लढविली व ग्रा.पं.चे पॅनेल उभे केले हे अनुभव अतिशय रोमांचक आहेत.
2012 झाली जि.प.ची निवडणूक पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांच्या विरुद्ध त्यांनी दिलेली लढत ही महाराष्ट्रात लक्षवेधी ठरली होती. नंतर ते भाजपात गेले व मी राष्ट्रवादीतच राहिलो,पण स्थानिक पातळीवरील ग्रा.पं. किंवा सोसायटी या निवडणुकांसाठी आम्ही एकत्रितच गट कायम ठेवला. परंतु पक्ष वेगळे असल्यामुळे पक्ष चिन्हांवर लढल्या जाणार्या इतर निवडणुकांमध्ये जि.प. असो की विधानसभा,लोकसभा यामध्ये त्यांच्यासोबत काम करु शकत नव्हतो, म्हणुन 2019 साली त्यांच्याच आग्रहामुळे मी भाजपात प्रवेश केला व आज भाजपात सुद्धा मान-सन्मान मिळाला.
बाळासाहेब दादा यांना मी आजपर्यंत कधीही कुणावर रागावताना,शिवीगाळ करताना पाहिले नाही. सर्वांशीच प्रेमाने बोलणारे दादा आज वयाचे 62 वर्ष पुर्ण करुन 63 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना भावी वाटचाली साठी मनपुर्वक शुभेच्छा!
रऊफ शेख,जिल्हाध्यक्ष,भाजपा,अल्पसंख्यांक मोर्चा







