श्रीगोंदा: तालुक्यातील अतिशय निंदनीय प्रकार समोर आला आहे. स्ट्रेचिंग करण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीशी जवळीक साधून, तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी येथील रनर्स अकॅडमीचा चालक जावेद शेख (हल्ली रा.जकातेनगर, श्रीगोंदे) याच्याविरुद्ध श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिस भरतीचे आमिष दाखवून तरुणीवर एका अकॅडमीच्या चालकानेच वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेतील आरोपीने संबंधित तरुणीचा गर्भपात करून तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद पीडित तरुणीने श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिली आहे.

पीडित विद्यार्थिनी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. ती नोव्हेंबर २०२४ पासून रनर्स अकॅडमीमध्ये सरावासाठी जात होती. एके दिवशी पीडितेने आपला पाय लचकल्याचे प्रशिक्षक जावेद शेख यास सांगितले. त्यावेळी त्याने तिला दुसऱ्या दिवशी पहाटे मैदानावर बोलविले. त्यावेळी स्ट्रेचिंग करण्याच्या बहाण्याने तो पीडितेला स्पर्श करू लागला. तिने विरोध करूनही त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले. सदरबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर धमकी देऊन आरोपीने अनेकदा महाविद्यालयीन तरुणी वर जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. या घृणास्पद प्रकारातून तरुणीला गर्भधारणा झाली.

जानेवारी २०२५ मध्ये पीडितेचे पोट दुखू लागल्याने ती शहरातील ग्रामीण रुग्णालयात गेली. तिथे तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिने ही बाब जावेद शेख याला सांगितली. त्यावेळी आरोपीने त्याच्या एका साथीदारासह पीडितेच्या खोलीजवळ जाऊन तिला गोळ्या दिल्या. त्या गोळ्या खाल्ल्याने तिचा गर्भपात झाला. या सर्व घटनेनंतर तरुणीने लग्नाबाबत जावेद कडे विचारणा केली असता त्याने लग्नासाठी नकार दिला.
विवाहास नकार दिल्यानंतर तरुणीने आपली फसवणूक झाल्याचे समजले. यावर तरुणीने पोलीस ठाण्यात जावेद विरुद्ध बलात्कारासह इतर गुन्ह्यांची तक्रार दाखल केली आहे. पोलीस भरतीचे आमिष दाखवून तरुणीवर एका अकॅडमीच्या चालकानेच वारंवार अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी मात्र पसार झाला आहे.







