मांडओहळ येथील नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने बोकनकवाडी ते वासुंदा रोडवर दुचाकीला दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू. वासुंदे गावात संताप
पारनेर तालुक्यात अवैध धंदे फोफावले आहेत. पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन या अवैध धंद्याना पाठीशी घालते आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. पारनेर तालुक्यात अवैध धंदे फोफावले आहेत. या मध्ये वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गाव पुढारीच वाळू तस्करी करत असल्याने प्रशासन देखील यांच्या दबावाला बळी पडत असून वाळू तस्करीला लगाम लावत नाही असे निदर्शनास येत आहेत. कालचा प्रकार अतिशय भयंकर घडला आहे. यात एका उमद्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. यामुळे या मुलाचे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. याला सर्वस्वी जबाबदार हे उदासीन प्रशासन आहे यात शंका नाही.

रविवारी (दि. ४) सकाळी ७ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. संतोष अहिला नन्हे (वय ३२, रा. बोकनकवाडी (वासुंदे) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या तरुणाची पत्नी बदलापूर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी आहेत. तसेच तरुणाची बहीणही पोलिस दलात कार्यरत आहे. या घटनेबाबत भाऊसाहेब रंगनाथ टोपले (वय ५०, रा. बोकनकवाडी (वासुंदे) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डंपरचालक विकास किसन शिंदे (रा. वडगाव सावताळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेनंतर डंपरमधील वाळू रस्त्यावरच खाली करून चालक पसार झाला.
या घटनेतील डंपर पारनेर पोलिस ठाण्यात लावला आहे. पोलीस प्रशासनाने डम्पर चालक याच्यावर गुन्हा दाखल करूनच न थांबता डंपर मालकावर देखील गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. पारनेर तालुक्यातून मुळा नदी व मांडओहोळ या नद्यांवरून सर्रास वाळू तस्करी होत आहे परंतु येथील महसूल प्रशासन तसेच पारनेर पोलीस प्रशासन या सर्व वाळू तस्करांना पाठीशी घालत असल्याचं समोर येत आहे. तसेच सदर वाळू तस्कर हे काही पक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचे संबंधित असल्याने यांच्यावर कारवाई होत नाही अशी चर्चा आहे. वाळू तस्करी चे मुळापासून उच्चाटन केल्याशिवाय अशा गुन्हेगारी वृत्ती थांबणार नाहीत त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन या प्रवृत्तींचा समूळ उच्चाटन करावे अशी मागणी आता सुज्ञ पारनेरकर करत आहेत.

प्रत्यक्षदर्शी व नातेवाईक यांच्या प्राप्त माहितीनुसार, संतोष नन्हे हा रविवारी (दि.४) सकाळी ७ वाजता आपल्या दुचाकीवर (एम.एच. १६, सी.एल. ६४०४) वासुंदा गावाकडे जात होता. बोकनकवाडी ते वासुंदा रोडवर वाळूने भरलेल्या डंपर (एम.एच. २२, ए.एन. ७१७१) याने पाठीमागून येऊन संतोषच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये संतोष नन्हे हे दुचाकीवरून खाली पडून तो डंपरच्या मागच्या चाकाखाली आला. राक्षशी डंपर चालकाने त्याला फरपटत नेले. संतोष याला टाकळी ढोकेश्वर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांनी संतोष ला मृत घोषित केले.
या घटनेनंतर वासुंदे येथील माजी उपसरपंच महादू भालेकर यांनी तहसीलदार गायत्री सौंदाणे यांना या घटनेची माहिती देण्यासाठी फोन केला असता, त्यांना तहसीलदार सौंदाणे यांनी अरेरावी केली. यामुळे ग्रामस्थ व मृताचे नातेवाईक यांच्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या दुर्दैवी घटनेने तालुक्यात महसूल प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरु असल्याचे आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे उत्तरीय तपासणीनंतर दुपारी ४ वाजता संतप्त नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह टाकळी पोलिस ठाण्यासमोर आणून ठेवला. आरोपी चालक-मालकाला हजर केले जात नाही, तसेच तहसीलदार याठिकाणी येत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला.
अखेर रात्री उशिराने सपोनि नितीन खंडागळे व सपोनि दीपक सरोदे यांनी वरिष्ठांशी व नातेवाईकांशी चर्चा करीत तोडगा काढला. त्यानंतर सायंकाळी उशिरा बोकनकवाडी येथे तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.






