संगमनेर प्रतिनिधी :प्रदूषण महामंडळा कडून स्टोनक्रशर तपासणीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सातव्या दिवशी उपोषणकर्त्यानी आज उपोषण मागे घेतले. आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ आणि नायब तहसीलदार सुभाष कदम यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील बेकायदेशीर स्टोन क्रशरच्या संदर्भात उप प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण महामंडळाने तपासणी करून दोषी असणाऱ्या सर्व स्टोन क्रेशर धारकांवर कारवाई करावी आणि त्याबाबतचा अहवाल तहसील कार्यालयाला सादर करावा, असे लेखी आश्वासन तहसीलदार धीरज मांजरे यांनी नायब तहसीलदार सुभाष कदम यांच्या मार्फत उपोषणकर्त्यांना दिले आले. या लेखी आदेशानंतर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ नीलम खताळ यांच्या हस्ते पिंपळे येथे गेली सात दिवस सुरू असणारे उपोषण लिंबू-पाणी देऊन मागे घेण्यात आले.

संगमनेर तालुक्यातील पिंपळे गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी जानकु बाबा ढोणे यांनी २५० एकर जमीन दान दिली. त्यावेळी मंदिर विश्वस्त समिती बनवण्यात आली होती. मात्र कालांतराने या समितीमधील सर्वजण वयोमानानुसार निधन पावले .त्यानंतर या मंदिराची देखभाल करण्याचे काम पिंपळे ग्रामपंचायती कडे देण्यात आले. जमिनीचा परिसर डोंगराळ भाग असल्यामुळे पिंपळे ग्रामपंचायती च्या तात्कालीन पदाधिकाऱ्यांनी तब्बल अडीशे एकर जमीन स्टोन क्रेशरधारकांना विकून टाकली. त्यामुळे संबंधितांवर कारवाई केली जाईल का असा प्रश्न उपस्थित झाला होता.
महसूलची परवानगी न घेता या गावात मोठ्या प्रमाणात स्टोन क्रेशर सुरू झाले, आणि त्याचा फटका गावातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या गंभीर घटनेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांभीर्याने लक्ष घालून पिंपळे ग्रामपंचायतीच्या गेल्या दोन दशकांच्या कारभाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी या ग्रामस्थांची होती. या देवस्थानाची लाटलेली २५० एकर जमिन परत मिळवून द्यावी तसेच अनाधिकृत स्टोनक्रेशर धारकांनी महसूल ची कुठली परवानगी न घेता परस्पर लाखो ब्रासचे उत्खणन केले आहे, त्या पोटी शासनाची बुडवलेली रॉयल्टी वसुल करावी. व या परिसरातील सर्व स्टोनक्रशर कायम स्वरुपी बंद करावेत, या मागणीसाठी या गावातील ग्रामपंचायत समोरील विठ्ठल मंदिरासमोर आण्णासाहेब चकोर आणि रमेश ढोणे या दोघा शेतकऱ्यांनी दि ३० सप्टेंबर २५ पासून उपोषण सुरू केले होते.
या उपोषणा संदर्भातील माहिती भाजपचे अभियंता सेलचे राज्य उपाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर यांनी आ अमोल खताळ यांना दिली. त्यांनी तात्काळ तहसीलदार धीरज मांजरे यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, अभियंता शेळके, राज्य उपाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर आणि नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन या स्टोन क्रेशरची प्रदूषण महामंडळाच्या विभागाकडून तपासणी करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी सौ खताळ यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन आपले उपोषण मागे घेतले आहे.
यावेळी पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मीनाताई ढोणे, ग्रामविकास अधिकारी, पोलीस अधिकारी, गावातील ग्रामस्थ युवा कार्यकर्ते व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







