कोथरुडमधील गोळीबारानंतरच्या मकोका कारवाईनंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला कुख्यात गुंड निलेश घायवळच्या पलायनाची रंजक मालिका आता पुढे येत आहे.सराईत गुन्हेगार निलेश घायवळ आणि टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई झाली खरी.
पण, घायवळचा ठिकाणा लागण्याआधीच तो परदेशात पसार झाला. पोलिसांचे हे अपयश समोर येत असताना आता त्याने पासपोर्ट, बँक उघडण्यासाठी रचलेल्या डावपेचांची मालिका उघड होत आहे.

पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, घायवळने अवघ्या दहा दिवसांपूर्वी बँकेत नवीन खाते उघडले होते. या खात्यासाठी त्याने कोणती कागदपत्रे वापरली, हे शोधण्यासाठी पोलीस चौकशी करत आहेत. बँक खात्यासाठी त्याने खोट्या नावाचा वापर केला असण्याची शक्यता आहे.पोलिसांनी संबंधित बँकेशी पत्रव्यवहार केला असून, जर खातं उघडताना चुकीची माहिती दिल्याचे सिद्ध झाले, तर बँक, संबंधित एजंटवरही कारवाई होणार आहे.
घायवळने अहिल्यानगर (जि. अहमदनगर) येथील कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील गौरी घुमट, नंदी बाजार, माळीवाडा रोड हा पत्ता वापरून पासपोर्ट मिळवला. या पत्त्यावर तो कधीही वास्तव्यास नसतानाही पासपोर्टची पडताळणी पूर्ण कशी झाली, असाही गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. कोतवाली पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घायवळचा गुन्हेगारी इतिहास न तपासताच संमती कशी दिली, यावर गृहमंत्रालय चौकशी करण्याची शक्यता आहे.

पुणे पोलीस आंदेकर गँगप्रमाणेच आता घायवळच्या अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्याची शक्यता आहे. पोलिस आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त पथकाकडून संबंधित मालमत्तांची माहिती गोळा केली जात आहे. घायवळने शहरात आणि आसपासच्या भागात ‘शेल कंपन्या’च्या नावावर मालमत्ता घेतल्या असल्याची माहिती असून, त्याच्या आर्थिक व्यवहारांची तपासणीही गुन्हे शाखेने सुरू केली आहे.घायवळ आणि त्याच्याशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार, बँक खाते, तसेच पासपोर्ट प्रक्रियेतील गैरव्यवहार तपासले जात आहेत. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित केली जाईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
निलेश घायवळच्या शाळेचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट आदी कागदपत्रांवर त्याचे आडनाव गायवळ असे आहे. असे असताना पोलीस दप्तरी त्याचे आडनाव घायवळ कसे आले, हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यांने ही सर्व कागदपत्रे पासपोर्ट काढण्यासाठी बनावट बनविल्याची शक्यता आहे. त्याने ही कागदपत्रे बनवताना अहिल्यानगरचा पत्ता दिला होता.

संपादक : सहदेव भि. जाधव संपर्क :9545529052
जाहिरात व बातमीसाठी संपर्क साधा वरील नंबर वर






